छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

0
12

रायपूर – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पीडीमील-पोलामपाली भागात विशेष पोलिस पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात पोलिस शहीद झाले असून, दहा जण जखमी झाले आहेत.नक्षल ऑपरेशनमधील वरिष्ठ अधिकारी आर. के. वीज यांनी सात जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
डोरनापाल आणि चिंतागुफा परिसरात एसटीएफ पोलिस पथक आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यापूर्वी या भागात माओवाद्यांनी सुरक्षा पथकातील जवानांवर घात लावून केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद झाले आहेत.
जखमी जवानांना जगदालपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हवाईमार्गे जगदालपूरला आणण्य़ात आले. एसटीएफच्या मदतीसाठी घटनास्थळी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन तुकडया पाठवण्यात आल्या आहेत.
शहीद झालेल्या पोलिस जवानांची ओळख पटली असून, कमांडर शंकर राव, रोहित सोधी, मनोज बाघेल, मोहन व्ही.के., राजकुमार मारकाम, किरण देशमुख आणि राजमान टेकाम अशी या जवानांची नावे आहेत.पिडमेल हा भाग सुकमा जिल्ह्यातील ताडमटेलाच्या जवळ आहे. येथे 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या 76 जवानांना लक्ष्य केले होते.