तीन जहाल नक्षल्यांना अटक

0
17

गडचिरोली–: जिल्हा पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत वडगाव येथून ३ जहाल नक्षल्यांना अटक केली आहे. कालिदास उर्फ रामसाय चमरु दुगा(२५), राधा उर्फ मनसारो रतूु हिडामी(२४) व तुळशीराम उर्फ कृष्णा मंगसिंह हिडामी(२५) अशी अटक केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.
मालेवाडा पोलिस व क्यूआरटीचे जवान वडगाव परिसरात नक्षलशोध मोहीम राबवीत असताना त्यांनी कालिदास दुगा, राधा हिडामी व तुळशीराम हिडामी यांना १२ एप्रिलला अटक केली. कालिदास दुगा हा धानोरा तालुक्यातील रोंडावाही येथील, तर राधा हिडामी व तुळशीराम हिडामी हे वडगाव येथील रहिवासी आहेत, कालिदास व राधा हे टिप्पागड दलमचे, तर तुळशीराम हिडामी हा कंपनी क्रमांक १० चा सदस्य असून तिघांवरही प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस होते, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कालिदास दुगा व राधा हिडामी यांचा खोब्रामेंढा येथे २०११ मध्ये झालेली चकमक, २००९ मध्ये जयराम नरोटे खून, कोहकाबोडी येथील बिजोसिंग हलामीचा खून, सोनसरी येथील २००९ मध्ये झालेली चकमक, २००९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिस पथकावरील हल्ला तसेच २०११ मध्ये निजामशहा व रमन काटेंगे यांच्या खून प्रकरणात सहभाग होता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कालिदास व राधा यांना न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत, तर तुळशीराम हिडामी यास १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.