भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भर बैठकीत मंदा म्हात्रे, वर्षा भोसले यांच्यात हाणामारी

0
18

नवी मुंबई : भाजपाच्या प्रदेश सचिव वर्षा भोसले यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. सीबीडी येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीत हा प्रकार घडला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीबीडी येथील के. स्टार हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार मंदा म्हात्रे व भाजपा प्रदेश सचिव वर्षा भोसले यांच्यासह बेलापूर क्षेत्रातील उमेदवार उपस्थित होते. यावेळी वर्षा भोसले यांच्याविरोधात तक्रार असलेली एक बाहेरची व्यक्ती तेथे आली. या बैठकीत कोणी बोलावले, यावरून आमदार मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील हा शाब्दिक वाद टोकाला पोहोचल्याचे समजते. केळकर यांच्या समक्ष घडलेल्या या प्रकाराची तक्रार भोसले यांनी पोलिसांकडे केली आहे.मंदा म्हात्रेंचा मुलगा निलेश म्हात्रे यांनी वर्षा भोसले यांचे समर्थक उत्तम रावल यांना मारहाण केल्याचा आरोप रावल यांनी केला आहे. या मारहाणीत रावल यांना हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर रावल यांनी सिबीडी-बेलापुरमध्ये धाव घेऊन मंदा म्हात्रे आणि त्याचा मुलगा निलेश म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तर या प्रकरणी सिबीडी-बेलापुर पोलीस ठाण्यात मंदा म्हात्रे आणि त्यांचा मुलगा निलेश म्हात्रे यांच्याविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली आहे.