जयललिता पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

0
13

चेन्नई, दि. २३ – अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा ६७ वर्षीय जयललिता यांनी आज पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्यांना निर्दोष सोडणाऱ्या निकालाने त्यांचा मुख्यमंत्रिपदी परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता आणि काल तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा देऊन जयललितांचा उरलेला मार्ग मोकळा करून दिला. आज सकाळी मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात हा शपथविधी पार पडला. या सोहळ्यासाठी शपथविधी सोहळ्याला सुपरस्टार रजनीकांत उपस्थित होते. त्यांच्याशिवाय जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पी.राधाकृष्णन, भाजप नेते एच. राजा आणि एल. गणेशन, भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आयसीसी चेयरमन एन. श्रीनिवासन उपस्थित होते.
तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी मंत्रीमंडळातील २८ जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले.जयललिता यांच्या सहकारी मंत्र्यांनी 14 – 14 च्या समुहाने दोन फेऱ्यांमध्ये सामूहिक शपथग्रहण केली. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बेहिशोबी बेहिशेबी संपत्तीप्रकरणी जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे गेल्यावर्षी २९ सप्टेंबर रोजी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती.