विधानसभाध्यक्ष पटोलेंनी सुनावली मुख्य सचिवांना शिक्षा, सभागृहात येऊन माफी मागा

,अजित पवार-फडणवीसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पटोले शांत

0
576

मुंबई(वृत्तसंस्था)दि.02ः- औचित्याच्या मुद्द्यांवरील विचारलेल्या प्रश्नांची वेळत उत्तरे मिळत नसल्याने नाराज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य सचिवांना विधीमंडळ सभागृहात येऊन जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले. पटोले म्हणाले की, राज्यभरातील आमदार विधीमंडळात आपले औचित्याचे मुद्दे उपस्थित करतात मात्र, त्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरे मिळत नाहीत. यावर उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेत्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.

विधी मंडळातील कामकाजबाबत अध्यक्ष नाना पटोले यांनी आज गंभीर पाऊल उचलत कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट माफीचे आदेश दिले. सभागृहात बोलतना नाना पटोले म्हणाले की, “मागच्या अधिवेशनात 83 औचित्याचे मुद्दे होते. त्यापैकी फक्त 4 उत्तर पाठवली आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या कामकाजाबाबत सचिवालयात अधिकारी दखल घेत नाहीत. मी जोपर्यंत खुर्चीत आहे तोपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान केला तर मी कारवाई करणार. तहसीलदार आमदारांचं ऐकत नाही, आदर करत नाही, आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. या वागणुकीला मुख्य सचिवांनाच जबाबदार धरलं जाईल. मुख्य सचिवांनी प्रशासन कसं काम करतं याकडे बघितलं पाहिजे,” असे म्हणत त्यांनी मुख्य सचिवांना सभागृहात येऊन माफी मागण्यास सांगितले.

यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना इतकी शिक्षा नको अशी भूमिका घेतली. ते म्हणाले की, “यापूर्वी असे कधीच घडले नाही. मुख्य सचिवांना एवढी मोठी शिक्षा नको. मी शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. मुख्य सचिवांनी माफ करा, आम्ही सुधारणार करू”, असे आश्वासन त्यांनी दिले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मताशी सहमती दाखवली. फडणवीस म्हणाले, “अजित पवार म्हणाले ते बरोबर आहे. ही शिक्षा कठोर आहे. अधिकाऱ्यांना दालनात बोलावून कठोर शब्दात समज द्या.”

अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी आपली कारवाई मागे घेतली. नाना पटोले म्हणाले, “उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी निवेदने केली आहेत. सभागृहाचे पावित्र्य ठेवले जात नसेल, तर कडक धोरण घेणे आवश्यक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी आश्वासन दिले आहे. म्हणून मी कारवाई मागे घेतो.”