पंकजा मुंडेंवर 206 कोटींच्या नियमबाह्य खरेदीचा आरोप

0
7

मुंबई,दि. २४- राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतेलल्या एका निर्णयामुळे त्या वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण खात्याने 13 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी 206 कोटी रूपयांच्या वस्तू व साहित्याची खरेदी केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घटनेला पंकजा मुंडेंसह मुख्यमंत्री फडणवीसांना जबाबदार धरले आहे.

ही खरेदी करताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचेही दिसून येत आहे. तीन लाखांपेक्षा जास्तीच्या खरेदीसाठी ई-टेंडरिंग काढण्याचा शासन निर्णय असतानाही पंकजा मुंडेंनी तो धाब्यावर एकाच दिवशी तब्बल 24 जीआर काढत खरेदीचे आदेश दिले होते. एकाच दिवशी 24 जीआर काढून खरेदीची घाई नेमकी कशासाठी असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबतचे वृत्त आज एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पंकजा मुंडे यांच्या खात्याने चिक्की, चटई, डिशेस, वह्या-पुस्तके आणि वॉटर फिल्टर अशी वस्तू व साहित्य खरेदीत नियमाचे उल्लंघन केले आहे. तसेच पंकजा यांनी ठरलेल्या किंमतीपेक्षा अधिक किेंमती वाढवून दिल्या आहेत. या सरकारी नियमाचे उल्लंघन झाले आहे. ई-टेडरिंगचा पर्याय वापरला नाही व ज्या संस्थांना ही कामे दिली आहेत ती वशीलेबाजीने दिल्याची शक्यता दिसत आहे.
यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले असून, महिला व बालकल्याण खात्यातंर्गत केलेली खरेदी ही केंद्र सरकारच्या नियमानुसारच केली आहे. खरेदी केलेले पदार्थ, वस्तू, साहित्यांबाबत अधिकृत दर उपलब्ध असल्याने ई-टेडरिंग करण्याचा प्रश्नच उद्धभवला नाही. सर्व कंत्राटे ही मान्यताप्राप्त असलेल्या संस्थांनाच दिलेली आहेत अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.