चेंगराचेंगरीसाठी देवाला जबाबदार का ठरवत नाही – रामगोपाल वर्मा

0
6

वृत्तसंस्था
मुंबई,दि. १९ – आंध्रप्रदेशमधील गोदावरी पुष्कर मेळाव्यासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना दोषी ठरवण्याऐवजी देवाला जबाबदार का ठरवले जात नाही असा वादग्रस्त सवाल सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे. देव त्याच्या भक्ताची सुरक्षा करु शकत नसेल तर बिचारे चंद्राबाबू नायडू कसे रक्षण करु शकतील असेही त्यांनी म्हटले आहे.

आंध्रप्रदेशमधील गोदावरी पुष्कर मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी चेंगराचेंगरीहून २० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीसाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व स्थानिक प्रशासनावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. आंध्र सरकार या मेळाव्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होत होता. मात्र वाचाळवीर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी देवालाच जबाबदार का ठरवले जात नाही असा प्रश्न ट्विटरव्दारे उपस्थित केला आहे. प्रार्थनेसाठी येणा-या भक्तांची देव रक्षा का करत नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. रामगोपाल वर्मा यांच्या ट्विटवरुन पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.