अखेर य़ाकूबला फाशी

0
14

पुन्हा मध्यरात्री झाले फाशी टाळण्याचे कायदेशीर युद्ध!
वाढदिशीच लटकविले फाशावर

नवी दिल्ली(दि.30) : याकूबने फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षा टाळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करून न्यायप्रक्रित खोडा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रकरणात याकूबच्या वकीलांना अपयश आले आहे. शेवटी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने याकूबची याचिका पुन्हा फेटाळल्या निर्णय थेट नागपूर येथील कारागृह प्रशासनाला कळविला. आणि अखेर साडेसहाच्या सुमारास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबला फासावर लटकवले गेले, दरम्यान, 1993 च्या साखळी बॉंम्बस्फोटातील पीडीतांना न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी राज्यात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.
राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली, महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही दया याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली सुधार याचिकाही फेटाळण्यात आली. तरीही याकूब मेमनच्या वकिलांनी अखेरचा डाव म्हणून बुधवारी रात्री दहानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात बुधवारी मध्यरात्री कायद्याचा कीस पाडण्याचा प्रयोग रंगला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने पहाटे पाच वाजता सर्व याचिका फेटाळून लावत याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला फाशी देण्यात आली.

बुधवारी बचावाचे सर्व मार्ग संपल्यानंतरही याकूबचे वकिल आनंद ग्रोव्हर आणि युग चौधरी यांनी आणखी एक याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरीच धाव घेत याकूबच्या नव्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली.
न्यायाधीशांनीही या सुनावणीस होकार दिला. सुरवातीला आलेल्या माहितीनुसार, ही सुनावणी मध्यरात्री ३.२० च्या सुमारास सुरू झाली.
या सुनावणीसाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय पुन्हा सुरू करण्यात आले. ३.२० ला सुनावणी सुरू झाल्यानंतर बचावपक्ष आणि सरकारी पक्षाने तासभर युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायाधीशांनी निर्णय वाचून दाखविण्यास सुरवात केली. अखेर पहाटे ४.५५ च्या सुमारास न्यायालयाने याकूबची याचिका फेटाळल्याचे जाहीर केले.
दरम्यान, नागपूरमध्ये फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू होती. पहाटे चारच्या सुमारास नागपूर तुरुंगातील अधिकार्‍यांचे मोबाईल फोन आणि इतर उपकरणे प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे काही वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात आले.