डॉ. कलामांच्या आठवणींनी गहिवरले गोंदियातील सरपंच

0
22

सुरेश भदाडे

देवरी- आपल्या देशातील प्रत्येक गाव आणि पाडा आपण स्वच्छ ठेवू शकलो, तर आपल्या देशात कधीही कोणताही आजार शिरकाव करू शकणार नाही. स्वच्छ भारत हाच खरा सशक्त भारताचा पाया आहे, असा संदेश भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी निर्मलग्राम पुरस्कार वितरित करताना व्यक्त केले होते. यावेळी दिल्ली येथे २३ मार्च २००६ रोजी आयोजित निर्मलग्राम पुरस्कार वितरण सोहळ्यात सामील झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील सरपंचांनी डॉ. कलाम यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.
आपल्या देशात आज स्वच्छ भारताचा नारा देत केवळ जाहिरातबाजी सुरू असल्याचे अनेक सरपंच आज व्यक्त करीत आहेत. मात्र, भारतरत्न डॉ. ए पी जे कलाम हे राष्ट्रपतीपदी असताना त्यांच्या स्वच्छतेच्या आवाहनाला देशातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता. डॉ अब्दुल कलाम यांनी ग्रामीण भागात राबविण्यात येणाèया या निर्मल अभियानाला प्रशासनासह जनतेच्याही सक्रिय सहभागाची नितांत गरज असल्याचे विचार व्यक्त केले होते.
देशामध्ये केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या निर्मलग्राम अभियानाचे २००४-०५ व २००५-६ चे पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्लीमध्ये वितरित करण्यात आले होते. त्यावेळी गोंदिया जिल्ह्यातील १००वर ग्रामपंचायती या निर्मलग्राम ठरल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र त्यात अव्वलस्थानी होता. आपले गाव निर्मल करणाèया सर्व सरपंचांचा सन्मान महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते केला गेला होता. गावाला मिळालेला निर्मलग्राम पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी सरपंच व सचिव हे दिल्ली येथे गेले होते. या सोहळ्यात अनेक सरपंचांना राष्ट्रपतींशी संवाद साधण्याची आणि हस्तांदोलन करण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यावेळी डॉ. कलाम यांनी सरपंचांना केलेले मौलिक मार्गदर्शन आजही ग्रामविकासात महत्त्वाचे ठरत असल्याचे लोकप्रतिनिधी अभिमानाने सांगत आहेत. अनेक सरपंचांनी आपल्या आठवणींना उजाळा देत डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली.
राज्यस्तरावर ग्रामस्वच्छता अभियानात द्वितीय पुरस्कार प्राप्त तिरोडा तालुक्यातील चोरखमारा ग्रामपंचायतीच्या सरपंच रामटेके यांची डॉ. कलाम यांनी प्रेमाने पाठ थोपटत असेच कार्य करीत रहा, यशाचे शिखर नक्की गाठाल, अशा आशावाद व्यक्त केल्याचे रामटेके यांनी सांगितले. चिचगडचे सरपंच राजू शहारे यांना तर डॉ. कलाम यांच्या आठवणी सांगताना जड जात होते. साहेबांच्या स्पर्शाने मी धन्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मुल्लाच्या माजी सरपंच अंजना भोयर यांनी आम्हा सरपंचांच्या पाठीवर मायेची थाप देत लोकआरोग्य टिकविण्यासाठी स्वच्छ गाव, शुद्ध पाणी ही संकल्पना मनापासून राबवा, यातच देशाची प्रगती आहे,असे म्हटल्याचे सांगितले. तिरोडा तालुक्यातील चुरडीच्या तत्कालीन सरपंच माया वालदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकांचा राष्ट्रपती, बालकांची आणि तरुणाची स्वप्ने जिवंत ठेवणारा देशाचा कुशल मार्गदर्शक हरपल्याचे सांगितले. ग्रामीण पातळीवर काम करणाèया आमच्या सारख्या माणसांची प्रेमाने विचारपूस करणारे ते महान व्यक्तिमत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. काल रात्री माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनाची बातमी कानावर पडताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकल्याचे या सरपंचानी बोलताना सांगितले. एका महान मार्गदर्शन व थोर शास्त्रज्ञाला देश मुकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.