सरपंच साहेबांची वक्रदृष्टी फिरली! चक्क सार्वजनिक विहिरीवर मोटर पंप

0
6

कुंपणाने शेत खाल्ले दाद मागावी कुणाकडे

दोन वर्षापासून मोटारपंपाद्वारे पाण्याची होताहेत वाहतूक

देवरी, दि.29-देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत शिलापूर गावातील विर बिरसा मुंडा चौक येथील सार्वजनिक विहिरीवर मोटारपंप लावून स्वतः सरपंच साहेबांनी नियमाचे उल्लंघन करीत असल्याची बाब समोर आली आहे. सरपंच स्वतःच नियमाचे उल्लंघन करीत असेल तर, गावाचा विकास कसा होईल. असे शिलापूरवाशीयांचे म्हणणे आहे. सरपंचावर वचक कुणाचे? असा असा प्रश्न ग्रामवशियाना पडला आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत शिलापुर या गावातील विर बिरसा मुंडा चौक येथे पुरातन काळापासून सार्वजनिक विहीर प्रशासनाकडून बांधण्यात आली आहे. या विहिरीतील पाण्यावर गावातील असंख्य कुटुंब अवलंबून आहेत. या सार्वजनिक विहिरीचे पाणी गावकरी दैनंदिन जीवनात वापर करतात. म्हणजेच सार्वजनिक विहिर शिलापूर या गावातील जनतेसाठी जीववाहिनी ठरत आहे.
परंतु, या विहिरीवर सरपंच साहेबानी वक्रदृष्टी फिरवली असून, चक्क सार्वजनिक विहिरीवर मोटर पंप स्वतःच्या हितासाठी बसविलेला आहे. स्वतःच्या घरी विहिरीतील पाणी वाहून नेण्यासाठी मोटार पंपाद्वारे पाईपलाईन बसवून, या पाण्याचा वापर स्वार्थापोटी करीत आहे. गावकऱ्यांनी याविषयी सरपंचाला विचारपूस केली असता, सरपंच उडवा उडवीचे उत्तरे देत “बनेल तो करा” या भाषेच्या प्रयोग करीत आहे.
स्वतः सरपंच नियमाचा उल्लंघन करीत असेल तर, दाद कुणाला? मागावी. असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या सरपंचावर प्रशासन काय कारवाई करेल?. असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. “कुंपणाने शेत खाल्ले दाद मागावी कुणाकडे” अशी अवस्था शिलापूरवाशीयांची झालेली आहे.

शोष खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण
विर बिरसा मुंडा चौक शिलापूर येथील सार्वजनिक विहिरीलगत मागील सहा महिन्यापूर्वी घन व्यवस्थापनेतून शोष खड्डा तयार करण्यात आले. परंतु या शोष खड्ड्यावर सुरक्षा कवच नसल्यामुळे, गावातील एखाद्या मनुष्यप्राण्याच्या केव्हाही अपघात होऊ शकतो. विर बिरसा मुंडा यांचा पुतळा असल्यामुळे, गावातील आदिवासी बांधव त्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम करीत असतात. कार्यक्रमांमध्ये लोकांची संख्या जास्त असल्यामुळे या उघड्या शोष खड्ड्यावर एखाद्या व्यक्तीचा तोल जाऊन त्याच्या अपघात होऊ शकतो. असे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अपघात झालास तर याची जबाबदारी कोण? घेणार असा प्रश्न शिलापूर ग्रामस्थांना पडला आहे.

बिरसा मुंडा चौक शिलापूर येथे पुरातन काळापासून असलेली सार्वजनिक विहीर ही संपूर्ण गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत असते. स्वतः ग्रामपंचायत सरपंचाने या सार्वजनिक विहिरीवर मोटार पंप लावून, आपल्या स्वघरी पिण्याच्या पाण्याची वाहतूक करीत आहे. यावर सरपंचाला विचारले असता, सरपंच यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिले आहे.
मुन्ना टेंभुरकर, ग्रामस्थ शिलापूर

स्वतः सरपंचाने मोटर पंप बसवला असून, नियमाचे उल्लंघन केले आहे. यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. मोटर पंप सुरू असताना विहिरीतील पाण्याची पातळी ही खाली जात असून, गावकरी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सरपंच स्वतःच गुन्हा करीत असेल तर आम्हाला न्याय कोण देणार?
मुकुंदराव भोयर, ग्रामस्थ शिलापूर

ग्रामसभेत सदर बाब निदर्शनात आणून दिली असता, गावचे सरपंचानी उडवा उडवीची उत्तरे ग्रामवशियाना दिली आहेत. विहिरीनजिक सहा महिन्यापूर्वीपासून बनविण्यात आलेल्या शोष खड्ड्यावर झाकण नसल्यामुळे, अपघात केव्हाही होऊ शकतो. या बाबींवर शासनाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा.
सचिन मेळे, ग्रामस्थ