कोरोना नियंत्रणात आणण्याकरीता जनजागृती व आरोग्यसेवा बळकटीस प्राधान्य-जिल्हाधिकारी मीना

0
2517

गोंदिया,दि.13ः- जिल्हाधिकारी म्हणून रूजू होताच जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना आजारावर मात कसे करता येईल याकरीता पाऊल उचलण्यास आपण सुरवात केली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी जनजागृतीसोबतच कोरोना रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांनी पत्रकारांशी सवांद साधतांना सांगितले.
आपण याआधी पांढरकवाड येथे उपविभागीय अधिकारीचे काम केले.त्यानंतर नाशिक व वाशीम येथे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होतो.जिल्हाधिकारी म्हणून ही माझी पहिलीच पोस्टिंग आहे. जिल्ह्याच्या प्रशासकीय कामासोबत येणार्‍या समस्या सोडविणे. तसेच विकासात्मक कामाला गती देण्यासोबत आजघडीला संपूर्ण विश्‍वाची समस्या असलेल्या कोरोनाला जिल्ह्यात नियंत्रित करण्याला आपले प्रथम प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी दीपककुमार मीना म्हणाले.जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी परिचय करून घेत अनेक विषयावर चर्चा केली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मी मूळचा राजस्थान राज्यातील दौसा जिल्ह्यातील असून माझे शालेय शिक्षण मध्यप्रदेश येथून झाले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, दिल्ली येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली, यानंतर एमबीए केला. खासगी क्षेत्रात एक वर्ष काम केले असून ते भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २0१३ च्या बॅचचे आहेत. यापूर्वी त्यांनी सन २0१५ मध्ये यवतमाळ येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, पांढरकवडा, त्यानंतर जिल्हा परिषद नाशिक येथे नऊ महिने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. तर फेब्रुवारी २0१८ पासून वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.सकारात्मक मुद्यांवर आपण पहिले काम करणार असून आपणही काही उपाययोजनासांठी मुद्दे सुचवावे असे म्हणाले.आठवड्याभरात जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांच्यासी बैठकीच्या माध्यमातून सर्व माहिती घेतल्यानंतर त्यावर काय करायचे हे सुध्दा आपणास नक्कीच सांगणार असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी रुजू झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा व इतर ठिकाणी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा संबधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून घेतला. कुठलेही काम प्रलंबित राहू नये व कुठलीही समस्या किंवा प्रश्न समोर आल्यास ते सोडविणार असे त्यांनी सांगितले. मात्र सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाचे बरेच प्रश्न दिसत असून कोरोना नियंत्रणात आणण्याला माझे पहिले प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.