गोसेखुर्दचे सर्वच दरवाजे उघडले

0
9

पवनी दि. ६: दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे गोसेखुर्द धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवरच्या जलसाठा वाढल्याने समतोल ठेवण्याच्या दृष्टीने तेथील पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे धरणाचा जलसाठा वाढला आहे.

धरणाचा जलसाठा २४०.७०० मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द धरण विभागाने धरणाचे ११ दरवाजे दीड मीटरने तर २२ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ७,३१६ क्युमेक्स म्हणजे २५८३६५ क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग सुरु आहे.

सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मंगळवारी धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडण्यात आला होता. मंगळवारी सुरु असलेल्या पावसाममुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्याची पातळी २४०.७०० मीटर स्थिर ठेवण्यासाठी ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.

गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहणाऱ्या नदीचा जलस्तर वाढला आहे. पाऊस सतत सुरु राहिल्यास वैनगंगा नदीकाठावरील गावांना याचा धोका संभवतो. सध्या धरणाचा जलसाठा १४.६३६ टीएमसी इतका आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.