कृषी विद्यापीठाच्या पूर्व विदर्भातील मालमत्तेचा लेखाजोखा तपासणार

0
5

नागपूर दि. ६ – – अकोला कृषी विद्यापीठाच्या विभाजनाला वेग आला. याकरिता कृषी विद्यापीठाच्या पूर्व विदर्भातील संपत्तीचा लेखाजोखा तपासण्यासाठी आठ सदस्यीय समिती शनिवारपासून (ता. ७) पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे.

पूर्व विदर्भातील धान संशोधनाला गती देण्यास पश्‍चिम विदर्भातील अकोला मुख्यालय असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अपयशी ठरल्याचा आरोप सातत्याने होत होता. याची दखल घेत धान (भात) संशोधनाकरिता स्वतंत्र विद्यापीठाची मागणी चंद्रपूरचे तत्कालीन आमदार व विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरली होती. त्याची दखल घेत तत्कालीन राज्य सरकारने वाय. एस. पी. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले. त्या समितीने आपल्या अहवालात विद्यापीठ विभाजनाला विरोध दर्शविल्याची चर्चा आहे. मात्र विद्यमान अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे विद्यापीठ होणार असल्याने या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलल्या जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे विद्यापीठ मुख्यालय प्रस्तावित आहे. पण, सिंदेवाही येथे विदर्भातील मोठे भात संशोधन केंद्र असून या ठिकाणी विद्यापीठाकरिता लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मूलऐवजी सिंदेवाहीचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. पूर्व विदर्भातील अकोला कृषी विद्यापीठाच्या संपत्तीचा आढावा घेतला जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव बाळासाहेब सावंत, कोकण विभागाचे मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) उदय गोविंद अवसरकर, अकोला व राहुरी विद्यापीठाचे अधिष्ठाता, नियंत्रक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा प्रतिनिधी, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशा आठ जणांचा समितीत समावेश आहे.