नागपुरात अतिवृष्टी

0
8

नागपूर दि. १३:- गेल्या बारा तासांपासून सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळे उपराजधानीतील जनजीवन ठप्प झाले असून, शहरातील तिन्ही नद्‌यांसह शंभरावर नाले तुडूंब भरले आहेत. अनेक चौकांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली असून, अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. नारा येथे चार जण वाहून गेल्याचीही माहिती आहे.
या पावसाळ्यात नागपूरकरांना पहिल्यांदाच वरुणराजाचा इतका भयानक प्रकोप पाहायला मिळाला. पावसाचा सर्वाधिक फटका खोलगट भागात राहणाऱ्यांना बसला. डोबीनगर आणि जोगीनगर येथे अनेक ठिकाणी माणुसभर पाणी साचले असून, जवळपास 70 टक्‍के भाग पाण्यात आहे. वस्त्यांचा संपर्क तुटला असल्याची माहिती, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नाग व पिवळी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.
उड्‌डाणपुलांवरुनही पाणी वाहत होते. या पावसाळ्यात प्रथमच अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. नारा येथील नाल्याच्या पाण्यात चार जण वाहून गेल्याची माहिती आहे. मात्र, वृत्त लिहीपर्यंत या बातमीला दुजोरा मिळाला नव्हता. पावसामुळे जागोजागी ट्राफिक जॅम झाला असून, पोलिसांनी अनेक मार्ग अन्य भागांकडे वळविले आहे. पावसामुळे कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलमध्ये दोन हजार मुले अडकल्याचीही माहिती आहे.