सीआरपीएफचे डीआयजी लाठकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस मेडल

0
11

नागपूर दि. १६: गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडणारे केंद्रीय सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक संजय लाठकर यांच्यासह नागपुरातील चार आणि ग्रामीणमधील एका पोलीस अधिकाऱ्याला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘पोलीस मेडल‘ जाहीर करण्यात आले. सुरक्षा दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधितांना राष्ट्रपतींद्वारे स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक बहाल करण्यात येतात.

आयपीएस बिहार कॅडर असलेले संजय लाठकर मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. उच्च विद्या विभूषित लाठकर यांनी प्रारंभी बीई सिव्हील केल्यानंतर आयआयटी पवईतून एमटेक (एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर १९९५ ला ते सरळ सेवा भरतीने भारतीय पोलीस दलात रुजू झाले. रणवीर सेना आणि नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात त्यांना पहिली नियुक्ती मिळाली. त्यांंनी येथे दोन वर्षात अनेक धाडसी कारवाया करून रणवीर सेना आणि नक्षलवाद्यांची दाणादाण उडवली. परिणामी त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी दोनवेळा प्राणघातक हल्ले चढवले. एका वेळच्या हल्ल्यात लाठकर यांना मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांनी गराडा घातला होता. अशा वेळी जीवाची पर्वा न करता लाठकर यांनी नक्षलवाद्यांशी आमनेसामने लढत देऊन दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले तर, इतरांना पळून जाण्यास बाध्य केले. या जिगरबाज कामगिरीमुळे लाठकर यांना शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले होते.