जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला रौप्य पदक

0
14

वृत्तसंस्था
जकार्ता, दि. १६ – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न भंगले असून अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिनने सायनाचा १६-२१, १९ -२१ ने पराभव केला आहे. मात्र या पराभवानंतरही सायना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
बॅडमिंटनमध्ये भारताचा ठसा उमटवणारी सायना नेहवालने इंडोनेशियात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी सायना ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती. या सामन्यात विजय मिळवून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याच्या इराद्याने सायना मैदानात उतरली होती. सायनासमोर आव्हान होते ते बॅडमिंटनमधील अव्वल खेळाडू कॅरोलिना मारिनचे. या सामन्यात कॅरोलिनाने दमदार खेळ करत सलग दोन सेटमध्ये सायनाचा पराभव केला व स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यापूर्वी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीतही कॅरोलिनाने सायनाचा पराभव केला होता.