शिर्डीवरुन परततांना तिरोड्यातील तिघांचा अपघाती मृत्यु

0
11

वर्धा दि.२४: : शिर्डी येथून परत येत असलेल्या गोंदिया येथील भाविकांच्या वाहनाला वर्धा-नागपूर मार्गावरील खडकी येथे अपघात झाला. या अपघातात एक जागीच ठार झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली.
तुलाराम श्यामराव सोनवणे (६0) रा. वडेगाव ता. तिरोडा, जि. गोंदिया, ईशिका लक्ष्मीप्रसाद बोरकर (४) रा. रजेगाव, ता. तिरोडा, जि. गोंदिया व कारचालक प्रवीण यशवंत वाघाडे (२५) रा. देरडीपार ता. तिरोडा, जि. गोदिंया अशी मृतकांची नावे आहेत. तर मोनिका लक्ष्मीप्रसाद बोरकर (२९) व छाया तुलाराम सोनवणे (५0) या दोन महिला गंभीर जखमी आहेत.
खडकी येथील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला ही गाडी उभी असताना भरधाव ट्रेलरने तिला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ट्रेलरचालकाने अपघातानंतर वाहन सोडून पोबारा केला.
पोलीस सूत्रानुसार, गोंदिया जिल्ह्यातील ११ भाविक देवदर्शन करून त्यांच्या एम.एच.३५ पी. ४२९२ या वाहनाने परत येत होते. परतीच्या प्रवासात ते खडकी (आमगाव) येथील हनुमान मंदिराजवळ दर्शनाकरिता थांबले होते. वाहनातील सहा भाविक गाडीबाहेर तर चालकासह पाच जण गाडीत बसून होते. अशातच नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रेलरने उभ्या असलेल्या या वाहनाला जबर धडक दिली. या धडकेत भाविकांचे वाहन सुमारे ३0 फुट अंतरापर्यंत फरफटत जाऊन पिंपळाच्या झाडाला धडकले. यात तुलाराम सोनवणे याचा जागीच मृत्यूझाला. कारचालक प्रवीण यशवंत वाघाडे व ईशिका बोरकर हे कारमध्ये फसले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले असता दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.