पत्रकार संघटनांचा : मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मूक मोर्चा’

0
10

पत्रकार संघटनांचा संयुक्त सूर : मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मूक मोर्चा’

चंद्रपूर दि.२४: जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाल्यानंतरही सर्वत्र दारूचा महापूर आहेच. दारूबंदी व्हावी यासाठी श्रमिक एल्गार संघटनेने पुढाकार घेतला होता. या विषयावर सावली येथील एका पत्रकाराने वृत्त विश्लेषण प्रकाशित केल्यानंतर श्रमिक एल्गार संघटनेने मात्र त्या पत्रकाराविरोधात एक दोन नव्हे तर तब्बल सहा पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदविली. श्रमिक एल्गार संघटनेचा हा प्रकार म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होय, असे मत रविवारी स्थानिक प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत मांडण्यात येऊन श्रमिक एल्गार संघटनेचा संयुक्तरित्या निषेध नोंदविण्यात आला.या संदर्भातील निवेदन देण्यासाठी मंगळवारी २५ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध पत्रकार संघटनांचा व जिल्ह्यातील पत्रकारांचा मूक मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी केली.

यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, माजी अध्यक्ष बबन बांगडे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बंडूभाऊ लडके, ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष किशोर पोतनवार, चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघाचे रवी बलकी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे नीलेश डहाट, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी सचिव संजय तुमराम, अरुण सहाय, संजय रामगिरवार, मजहर अली, प्रमोद उंदीरवाडे, मोहन रायपूरे, पंकज शर्मा, आशिष अंबाडे, रवी जुनारकर, पंकज मोहरीर, प्रशांत विघ्नेश्वर, साईनाथ सोनटक्के, शेख अनवर, विशाल टिकेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी सावली येथील पत्रकार उदय गडकरी यांच्या विरोधात मूल, सावली, सिंदेवाही, जिवती, पाथरी व नागभीड येथे कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, यावर चर्चा करण्यात आली. गडकरी यांनी ‘पारोमिता मॅडम कुठे आहेत तुमचे २५ हजार कार्यकर्ते?’ या मथळ्याखाली वृत्त विश्लेषण प्रकाशित केले होते. गडकरी यांनी या विश्लेषणात उपस्थित केलेले मुद्दे योग्य असून अशा वृत्ताच्या विरोधात पोलीस तक्रार करुन गुन्हे दाखल केले जात असतील तर ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होय, असे मत यावेळी अनेकांनी मांडले. त्यामुळे श्रमिक एल्गार संघटनेचा आजही ही सभा निषेध करते, असे ज्येष्ठ पत्रकार मोहन रायपुरे यांनी जाहीर केले.