गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे गतिमान करा – मुख्यमंत्री

0
10

मुंबई ,दि. २५ : गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात मंगळवारी गोंदिया जिल्ह्यातील विकास कामांबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डांगुर्ली बंधाऱ्याचे काम गतिमान करण्यासाठी आंतरराज्यीय सिंचन मंडळासोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल. नवेगांव डेवरी उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी आपण राज्यपालांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावू, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना ग्रामस्थांना विविध योजना एकत्र करुन घरे देता येतील का याचा विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गोंदिया शहरात जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आराखडा, अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता घेणे आदी कामे तातडीने पूर्ण करुन या कामाला गती देण्यात यावी. तसेच जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीसही मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

गोंदिया शहरात समाजभवन उभारणे, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय गोंदिया शहरातील बाह्य वळण रस्त्याच्या बांधकामासही आवश्यक निधीची उपलब्धता करुन देऊन हा वळण मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.