. आमगाव दि.४: तालुक्यातील अनेक ठिकाणी गेल्यावर्षी पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. त्या रस्त्यांची डागडुजी जिल्हा परिषद तसेच सामाजिक बांधकाम विभागाने केली. परंतु अधिकारी व कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे निकृष्टपणे केल्याने त्या रस्त्यांची वाताहत सुरु झाली. या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराला आता मनसेने आव्हान देत त्याविरूद्ध एल्गार पुकारला आहे.
आमगाव तालुक्यात सन २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात शासनाने तालुक्यात झालेल्या अतवृष्टी व पुरग्रस्त परिस्थितीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता. शासनाने या रस्ते बांधकाम दुरुस्तीकरीता निधीची तरतुद केली. या निधीअंतर्गत जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत कोट्यवधींची कामे निविदा न काढताच वाटण्यात आली. त्यामुळे अधिकारी व कंत्राटदारांनी या कामासाठी संबंधितांकडून आर्थिक व्यवहार केले. यातून त्यांची अनियमितता पुढे आली. तयार झालेले व डांबरीकरण रस्ते बांधकामाच्या सहा महिन्याच्या अवधीतच मातीमोल झाले. यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना निकृष्ट रस्त्यांवर पायवाट काढावी लागत आहे. रस्त्यांच्या वाताहतीमुळे वाहन अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
बांधकाम विभाग जिल्हा परिषद या विभागांतर्गत रस्ते बांधकाम झालेल्या भ्रष्टाचाराला आता मनसेने आव्हान दिले आहे. रस्त्यांची बांधकाम दुरुस्ती त्वरीत करुन दोषींवर कारवाई करा, असा पवित्रा घेऊन उपविभागीय अधिकारी, जि.प. बांधकाम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताच विभागाने सदर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली.