दारुबंदीसाठी चळवळ उभारा-अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी

0
14

भंडारा दि.१: लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीमुळे अवघ्या सहा महिन्यात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने खाली आला. अनेकांचे राहणीमान उंचावले. अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले. त्यामुळे दारुचे दुष्परिणाम सांगण्यासाठी दारुबंदीसाठी चळवळ उभारा, असे आवाहन श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.

सालेभाटा येथे दारुबंदी मेळाव्यासाठी आले असता त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्यात झालेली दारुबंदी ही वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी तिथे दारु पिण्यासाठी अनेकांकडे परवाने आहेत. त्यामुळे दारु समूळ नष्ट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे परवाने दिले गेले नाही. २००१ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीसाठी प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नव्हते. २०१० मध्ये चिमूर ते नागपूर अशी महिलांची पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकार जागे झाले नाही. त्यामुळे २०१३ मध्ये महिलांनी मुंडण आंदोलन केले. याची राज्य शासनाने दखल घेऊन देवतळे समिती गठित केली. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आली तर दारुबंदी करण्याचे अभिवचन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. सत्ता आल्यानंतर त्यांनी शब्द पाळला आणि दारुबंदीच्या प्रयत्नाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा दारुमुक्ती आंदोलन समितीची घोषणा केली. या समितीत नरेश बोपचे, राजेंद्र फुलबांधे, अनिल मेंढे, माधुरी नखाते, हरीष तलमले, सभापती शुभांगी रहांगडाले, माजी सभापती वीणा झंझाड, माजी जि.प. अध्यक्ष अ‍ॅड. वसंत एंचिलवार, रवींद्र खोब्रागडे, अजय तुमसरे यांच्यासह महिलांचा समावेश आहे.