ओबीसींना हवाय लोकसंख्येवर आधारित आरक्षणात वाटा

0
15

पवनी दि.१: सद्यस्थितीत भारतात ६० ते ६५ टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. त्यांचे भरवशावर राजकारण सुरू आहे. परंतु जेव्हा जनगणना केली जाते तेव्हा ओबीसींना वगळून इतरांची प्रवर्गानुसार जनगणना केल्या जात नाही. सरकारची हिच मानसिकता बदलायला हवी. स्वातंत्र्यपुर्व काळात जातीय आधारावर जनगणना करण्यात आली. तेव्हाच ओबीसी समाज ५२ टक्के होता. त्यामुळे त्या आकड्यांना आधार मानले तरी ओबीसींना ५२ टक्के आरक्षणात वाटा असावा असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी केले.

स्थानिक गांधी भवनात ओबीसी सेवा संघाच्या तालुकास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. गांधीजी राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारखे महापुरूष सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढले. ओबीसी समाजाने सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज झाले पाहिजे. त्याशिवाय आपले हक्क मिळणार नाही, असे विचार इंजि. ढोबळे यांनी व्यक्त केले.

दीप प्रज्वलीत करून अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपिठावर बालरोगतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा बेहरे गावतुरे, सेवा संघाचे समन्वयक विजय तपाडकर, भंडारा जिल्हा अध्यक्ष गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, महेंद्र धावडे, माजी जि.प. सदस्य मोहन पंचभाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. अभिलाषा बेहरे यांनी ओबीसी समाज देशातील मुळनिवास आहे. मात्र परकियांच्या आक्रमणानंतर परकिय सत्ताधिश झाले व मुळनिवासी गुलाम बनले. समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजसुधारकांनी प्रयत्न केले. एखाद्या कंपनीत देखिल ५१ टक्के भागभांडवत असलेला गृहस्थ कंपनीचा मालक बनतो परंतु या देशात ओबीसी ६० ते ६५ टक्के असूनही सत्तेपासून दूर लोटला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विजय तपाडकर यांनी देशात साडेबारा असलेला समाज सातत्याने सत्ताधिश आहे परंतू ओबीसी अठरापगड जातीमध्ये विभागले असल्याने एकत्र नाही त्यामुळे आपण आपल्या अधिकारापासून वंचित आहोत, असे विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर यांनी विचार व्यक्त केले. सेवा संघाचे कार्यकर्ते श्रीकृष्ण पडोळे, हाडग गुरूजी, सुनंदा मुंडले, डॉ. प्रती राखडे, राम भेंडारकर, अरविंद काकडे, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. अतुल दोनोडे, अशोक पारधी यांनी अतिथींचे स्वागत केले.

प्रास्ताविक उमाजी देशमुख, संचालन डॉ. विक्रम राखडे तर आभार प्रदर्शन रविंद्र रायपूरकर यांनी केले. तालुका ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष डॉ. विक्रम राखडे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी वाहिले अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.