कार्यकारी अभियंता छप्परधारेला शेतकर्‍यांनी धरले धारेवर

0
8

आरमोरी दि.5: आरमोरी भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारला आरमोरीच्या इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकार्‍यांना घेराव घातला होता. शेतकर्‍यांचा रोष लक्षात घेऊन इटियाडोह प्रकल्प गोंदियाचे कार्यकारी अभियंता छप्परधारे हे रविवारी आरमोरीत दाखल झाले. यावेळी शिवसेनाचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने व शेकडो शेतकर्‍यांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर आरमोरी भागातील शेतकर्‍यांना धानाचे पीक निघेपर्यंत पाणी पुरवठा केला जाईल, असे लेखी आश्‍वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.
शेतीला पाणी पुरवठा होण्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांनी कार्यकारी अभियंता छप्परधारे यांना घेराव केला. पाणी वाटपाचे योग्य नियोजन करून तातडीने मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी रेटून धरली. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी शेतकर्‍यांना लेखी आश्‍वासन देऊन पाण्याची समस्या निकाली काढण्याची हमी दिली. आरमोरी टेलला असणार्‍या सात पाणी वाटप संस्थांना हक्कदारीनुसार आरमोरी शून्यवरून १.१0 मीटर गेजचे पाणी समान पध्दतीने देण्यात येईल. तसेच धानाचे उत्पन्न निघेपर्यंत सिंचन व्यवस्था सुरू राहिल, असे आश्‍वासन कार्यकारी अभियंता छप्परधारे यांनी दिली. यावेळी राजू अंबानी, उपविभागीय अभियंता गोगटे, मेंढे, राठोड, नामदेव सोरते, शंकर घाटुरकर उपस्थित होते.