आज चंद्रपूरच्या धम्मभूमीवर होणार ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ’

0
15

चंद्रपूर दि.१५: १६ आॅक्टोबर १९५६ साली चंद्रपुरात ऐतिहासिक क्रांती घडली. दलित-पीडितांचे मसिहा क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या क्रांतीकारी घटनेचा आठवण सोहळा म्हणजे ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ’….! यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने चंद्रपुरात अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे. १५ आणि १६ आॅक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालय परिसरातील दीक्षाभूमी सजली आहे. आज १५ आॅक्टोबरला सायंकाळी या सोहळ्याचे उद्घाटन होत आहे.

५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील भदन्त महापंथ महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे उपाध्यक्ष मारोतराव खोबरागडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील.

१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि कलशासह भिक्खूगण आणि समता सैनिक दलातील सैनिकांच्या सहभागात मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहचेल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता सामूहिक बुद्धवंदना व आणि धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई राहतील.विशेष अतिथी म्हणून भिक्खू नागघोष थेरो (नागपूर), भिक्खू करूणानंद (मुंबई), भिक्खू धम्मबोधी (औरंगाबाद), भिक्खू पत्रारत्न (नांदेड), भिक्खू नगाप्रकाश (नागपूर) उपस्थित राहतील.

सायंकाळी ६ वाजता मुख्य समारंभाला सुरूवात होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार भदन्त अथुरलिये रतन थेरो (श्रीलंका), खासदार तथा आतंरराष्ट्रीय क्रिके टपटू सनथ जयसूर्या, विशेष अतिथी म्हणून भदन्त बोधिसारा थेरो (श्रीलंका), भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो (घुग्घूस), धम्माचारी पद्मबोधी (नागपूर), पुणेचे जिल्हाधिकारी सदानंद कोचे, डॉ.कौशल पवार (नवी दिल्ली) आदी उपस्थित राहतील.त्याच दिवशी रात्री १० वाजता ‘सद्धम्माची गौरव गाथा’ हा बुद्ध-भीम गितांचा कार्यक्रम हेमंत शेंडे व त्यांचा संच सादर करणार आहेत.