धान खरेदी तातडीने सुरू करा-परशुरामकर

0
5

गोंदिया दि.१८: सिंचनाची सुविधा नसलेल्या कोरडवाहू शेतातील धानाचे पिक मोठय़ा प्रमाणावर निघाले असून धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकर्‍यांना अत्यंत कमी भावाने आपला धान व्यापार्‍यांना विकावा लागतो. शेतकर्‍यांचे होणारे नुकसान लक्षात घेवून जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता गंगाधर परशुरामकर यांनी केली.
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर कोरडवाहू शेती असून या ठिकाणी शेतकरी लवकर निघणार्‍या धानाच्या जातीचा पेरा करतात. हे धान ९0 दिवसात निघणारे असल्याने कोरडवाहू शेतीतील संपूर्ण धान निघालेला आहे. अडचणीत असलेला शेतकरी धान खरेदी केंद्र नसल्याने व्यापार्‍यांकडे धानाची विक्री करत आहे. शेतकर्‍यांचा हिताच्या वल्गना करणारी मंडळी सत्तेत असूनसुद्धा शेतकर्‍यांना हिताचे निर्णय घेण्यास विसरलेली आहे. सत्तेत नसताना डोक्याला फेटे बांधून मोर्चे काढणार्‍यांना आता शेतकर्‍यांचा विसर पडलेला दिसतो. ८ धान खरेदी केंद्र सुरू केले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.