भरारी पथकाकडून २८ कामांची पाहणी

0
7

भंडारा दि.१९ : मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी झालेल्या २८ कामांची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील अधीक्षक अभियंता स्तरावरील भरारी पथक भंडारा जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी होते. मंत्रालयातून पाठविण्यात आलेल्या या पथकाने कामांची चौकशी केली. या चौकशीत गंभीर प्रकार समोर आल्याचे सांगून महिनाभरात अहवाल देऊ, असे पथकाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शनिवारला साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी भंडारा विश्रामगृहात एका उपविभागीय अभियंत्याला शिवी व जीवे मारण्याची धमकी दिली, हे वृत्त चुकीचे असल्याचे माजी आमदाराने स्पष्ट केले. शनिवारला आपण विश्रामगृहात कार्यकर्त्यांसोबत असताना आपल्या स्वीय सहायकाला रागावत होतो. हे रागावणे तिथे उपस्थित अधिकारी स्वत:वर लावून घेत असतील तर ते चुकीचे आहे. याउलट आपण आमदार असताना या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी दोन वरिष्ठ अभियंते निलंबित झाले होते.या कामांची पाहणी करण्यासाठी आलेली ही चौथी चौकशी समिती आहे. या चौकशी समितीने निष्पक्ष चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे.

त्याकाळात जे लोक कंत्राटदार होते. ते आता पदावर आहेत. त्या काळात त्यांनी जी कामे न करता देयके उचलली आणि केलेली कामे निकृष्ट केली. त्या कामांचीही चौकशी निष्पक्ष व्हावी, अशी आपली मागणी आहे. याउलट मी किंवा माझ्या कुटुंबातील एकही सदस्य कंत्राटदार नाही.