तुमसरात २०० किलो खवा पकडला

0
11

तुमसर दि.५ : तिरोडा येथून भंडारा येथे एस.टी.तून २०० किलो खवा घेऊन एक व्यावसायिक जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने तुमसर बसस्थानक त्या व्यावसायिकाची चौकशी करून खव्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. या परिसरात आंतरराज्यीय खाद्यपदार्थ विक्रीची टोळी सक्रिय असल्याची माहिती या पथकाने दिली.

अगनलाल फागोलाल लिल्हारे (५२) रा.पिपरीया ता.तिरोडा हे तिरोडा नागपूर बसमधून २०० किलो खवा घेऊन जात होते. तुमसर बसस्थानकावर बुधवारला सकाळी ८.३० च्या सुमारास भंडाऱ्याचे अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड यांनी त्यांना गाठले. यावेळी धवड यांनी लिल्हारे यांची चौकशी करीत असताना विचारले असता त्यांनी हा खोवा भंडारा येथील हॉटेलमध्ये विक्री करतो, असे पथकाला सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी धवड यांनी या खव्याची तपासणी करून काही नमुने घेतले. हे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.