आमदार देशमुखांना अटक करा युवक काँग्रेसची निदर्शने

0
4

नागपूर दि.5: काटोल मतदारसंघातील भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे रोही व हरणाच्या शिकारीचे फेसबुकवर व्हायरल झालेल्या फोटोवरून वादळ उठले आहे. मात्र या प्रकरणात काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढे येत आ. देशमुख यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर, बुधवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत देशमुख यांच्या अटकेची मागणी केली.

देशमुख यांनी केदारपूर काटोल येथील जंगलात तीन निलगायींना बंदुकीने गोळ्या झाडून ठार केले, असा आरोप करीत हा कृतीसाठी देशमुख यांना वन कायद्यांतर्गत अटक करावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी झिरो माईल येथील मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात आ. देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हरीण आणि निलगाय सोबतचे देशमुख यांचे फोटोही झळकविण्यात आले.

शेळके यांनी कार्यकर्त्यांसह उप वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी शेळके म्हणाले, सुधारित वन कायद्यानुसार फक्त शेतकरीच आपल्या पिकाची नासाडी करणाऱ्या प्राण्यांची, वन विभागाची रितसर परवानगी घेऊनच शिराक करू शकतात. परंतु आमदार देशमुख यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून निलगायीची शिकार केली. शिकार केलेल्या परिसरात देशमुख यांचे स्वत:चे शेत नाही. ज्या बंदुकीने शिकार केली त्या बंदुकीचा परवाना देखील देशमुख यांच्या नावावर नाही. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आ. आशिष देशमुख यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी उपवनसंरक्षक यांना दिले.