वाशिम ई-पीक पाहणी अंतर्गत १ लाख ३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

0
28
  • महसूल विभागामार्फत केलं जातंय मार्गदर्शन
  • जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा

वाशिम, दि. ०९  : ई-पाहणी अंतर्गत जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ९८० खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार ६८८ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाईन नोंदणी केली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ऍपच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतपिकांची अचूक नोंदणी करावी, यासाठी महसूल विभागामार्फत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांद्वारे आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे.

ई-पीक पाहणीमध्ये मोबाईल ऍपद्वारे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद करून शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाईल ऍपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतील, या ऍपमध्‍ये त्या क्षेत्राच्या अक्षांश व रेखांशाची नोंद होणार आहे. शेतकऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या माहितीची तलाठ्यांमार्फत पडताळणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये घेतली जाणार आहे.

ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून शेतपिकांच्या नोंदणीची मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी स्वतः वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोहिमेचा आढावा घेतला. तसेच या अनुषंगाने सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत वाशिम तालुक्यातील १७ हजार ७९, रिसोड तालुक्यातील २० हजार ५८४, मालेगाव तालुक्यातील १३ हजार ६७०, मंगरुळपीर तालुक्यातील १५ हजार ४४९, कारंजा तालुक्यातील २४ हजार ५६१ आणि मानोरा तालुक्यातील १२ हजार ३४५ खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍपवर नोंदणी केली आहे.

‘ई-पीक पाहणी’विषयी काही अडचणी असल्यास महसूल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा

ई-पीक पाहणी ऍपचा वापर करून स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करण्याविषयी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही हे ऍप वापरण्याविषयी शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्यास त्यांनी आपल्या गावाचे तलाठी, संबंधित मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.