तर्पण फाउंडेशनच्या विदर्भ टीमची नागपूरात पार पडली बैठक

0
24

नागपूर,दि.11-तर्पण फाऊंडेशनच्या विदर्भातील विविध जिल्ह्यातील संचालक व समन्वयकांची बैठक 9 सप्टेंबरला येथील हॉटेल तुली इंपीरियल येथे पार पडली. या बैठकीला तर्पण फाऊंडेशनचे प्रबंध संचालक श्रीकांत भारतीय व विदर्भाचे प्रभारी व प्रसिद्ध अभिनेता निर्देशक संचित यादव उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्रीकांत भारतीय यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील समन्वयक प्रतिनिधींसमोर तर्पण फाउंडेशनची भूमिका विशद केली. तर्पण फाउंडेशनचा मूळ उद्देश वय वर्ष अठराच्या वर होणाऱ्या अनाथ मुला मलींना आधार देणे हा होय. यामागील सामाजिक आशय भारतीय यांनी स्पष्ट केला. वय वर्ष 18 पर्यंत शासकीय व्यवस्थेत या मुलांची सोय होते मात्र नेमके पौगंडावस्थेत पदार्पण करताना त्यांना शासकीय व्यवस्थेतून बाहेर पडावे लागते आणि या काळात त्यांना मानसिक, भावनिक,शैक्षणिक व आर्थिक आधाराची गरज असते. याच नेमक्या प्रश्नावर उत्तर म्हणून तर्पण फाऊंडेशनचे कार्य चालते. तर्पण फाऊंडेशनचे या घडीला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी असून तर्पण परिवाराच्या माध्यमातून या कार्याला सहकार्य करणारे व फॉलो करणारे आठ हजार नागरिक आहेत. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 513 अनाथ मुला-मुलींना शैक्षणिक कार्य चालू राहावे याकरिता त्यांचे शैक्षणिक शुल्क तर्पण भरणार असून या विद्यार्थ्यांमध्ये एमएससीआयटी, आयटीआय अशा कोर्स पासून ते एमबीबीएस पर्यंत सर्व विद्यार्थी अंतर्भूत आहेत. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण घेऊ इच्छिणारे अनाथ मुला मुलींची यादी व त्यांना कोणते शिक्षण घ्यावयाचे आहे याबाबत तपशील सर्व प्रतिनिधींना देण्यात आला. यानुसार अनाथ विद्यार्थी ज्या वसतिगृहात सध्या आहे त्या ठिकाणी संपर्क करून सर्व तर्पण चे संचालक व समन्वयक त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवणार आहे.
तर्पण चे नागपूरचे प्रतिनिधी मनीष केवलीया यांनी या बैठकीचे यशस्वी आयोजन केले. या बैठकीसाठी मुंबईहून संचालक संचित यादव,सुनील पाठक अमरावती,संदेश खंडेलवाल अकोला,अविनाश देव वर्धा,मकरंद देशपांडे नागपूर,गोविंद सारडा गडचिरोली,प्रा डॉ हेमंत देशमुख भंडारा,राजू पडगिलवार यवतमाळ,अभय सावंत गोंदिया,हर्षल जोशी बुलढाणा हे सर्व समन्वयक हजर होते.संचित यादव यांनी तर्पण परिवाराच्या वतीने सर्व प्रतिनिधींचे व बैठकीचे संयोजक मनीषजी केवलीया यांचे आभार मानले.