मोहाडी नगरपंचायतच्या ई-निविदेत घोळ

0
29

मोहाडी-  नगरपंचायत मोहाडीद्वारे काढण्यात आलेल्या कोट्यवधी रूपयांच्या निविदेत घोळ करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शहर काँग्रेस तर्फे करण्यात आला असून आंदोलनाचा इशारा नगर विकास मंत्र्याना दिलेल्या तक्रारीतून देण्यात आला आहे.
नगर पंचायत मोहाडी येथे सध्या प्रशासक नियुक्त असल्याने ही नगरपंचायत हिटलरशाही धोरणाकरिता प्रसिद्ध असून नेहमी चर्चेत असते. असाच घोळ ई निविदा काढतेवेळी मोहाडी नगर पंचायत तर्फे करण्यात आलेला आहे. शासनाच्या वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत करण्यात येणार्‍या सिमेंट रस्ते, नाली ईत्यादी कामाकरिता अंदाजे ३ कोटी रुपये मंजूर असून ३ कोटी, १८ लक्ष, २0 हजार ६४४ रुपये किमतीची कामे प्रस्तावित करण्यात आलेली होती. परंतु निविदा काढताना फक्त २ कोटी २३ लक्ष रुपये किमतीची बोगस निविदा काढून स्वत:च्या लाभासाठी घोळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. यात लहान मोठी कामे एकत्रीत (क्लब) करुन ९८ लक्ष रुपये व १ कोटी २५ लक्ष रुपये किमतीच्या दोन वेगवेगळ्या निविदा काढण्याचे कारण काय ? संपुर्ण कामे एकत्रित करुन एकच निविदा का काढण्यात आली नाही? अंदाजपत्रकियनुसार रक्कम एक कोटी ३ लक्ष १७ हजार ५३७ रुपये आहे, परंतु निविदा ९८ हजार रुपयांचीच आहे. तसेच अंदाजपत्रकिय दोन नुसार रक्कम एक कोटी ३२ लक्ष, ९७ हजार ३६७ रुपये आहे. परंतु निविदा एक कोटी, २५ लक्ष रुपायांचीच काढण्यात आली. हे काम लाखनी येथिल ”राज” कन्स्ट्रकशन कंपनीला देण्यात आले. यामध्ये मोठा घोळ करण्यात आलेला आहे. निविदा काढताना वस्तू व सेवा कराची रकम निविदेत समाविष्ट न करता ई निविदा काढण्यात आली.
निविदेची जाहिरात कोणत्या वर्तमान पत्रात देण्यात आली हे कळायला मार्गच नाही. कारण ही निविदा कोणालाही दिसली नसल्याने जाहिरात देण्यात आली की नाही हे गुलदस्त्यात असून र्मजीतील व्यक्तीला ठेका देण्यासाठी तर हा खटाटोप करण्यात आला नाही ना, असा संशय आहे.
वरिल निविदा काढताना करण्यात आलेला घोळ प्रकरणाचे स्पष्टीकरण तीन दिवसात देण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस मोहाडी शहरच्या वतीने नगर पंचायत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे शहर अध्यक्ष पुरषोत्तम पात्रे, माजी उपसभापती खुशाल कोसरे, युवा नेते रफिक (बबलू) सैय्यद यांनी दिला आहे.
निवेदनाची प्रत ईमेल द्वारे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे , खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी भंडारा यांना उचित कार्यवाहीस सादर करण्यात आली असून , आता या प्रकरणाकडे संपुर्ण मोहाडीवासीयांचे लक्ष लागुन आहे.