मनपाच्या पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेला गणेशभक्तांचा प्रतिसाद

0
7
घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांना पारितोषिक

चंद्रपूर, ता. १३ : श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा ! पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. स्पर्धेचे मूल्यमापन १७ सप्टेंबर रोजी होईल.

इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी शाडूची मूर्ती किंवा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती, प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट, नैसर्गिक व पर्यावरण पूरक सजावट, विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा  असणे आवश्यक आहे.

घरी किंवा मनपातर्फे उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करावे, वृक्षलागवड / जलसंधारण / इलेक्ट्रिक वाहनांचा वापर / स्वछता / प्रदुषण थांबविणे / वातावरण बदल जागृती इत्यादी बाबत देखावे (थीम) असावेत. ही स्पर्धा २ गटात घेण्यात येईल. पहिल्या गटात घरगुती गणेश उत्सवाचा समावेश असेल. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील ३ झोनमधील प्रत्येक झोननिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय असे ३ बक्षिस देण्यात येणार आहेत. यात प्रथम पुरस्कार ५००० रुपये, द्वितीय पुरस्कार ३००० रुपये, तृतीय पुरस्कार २००० रुपये आहे. दुसऱ्या गटात सार्वजनिक गणेश मंडळाचा समावेश राहील. या गटातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3 बक्षिस देण्यात येतील. प्रथम पुरस्कार २१,००० रुपये, द्वितीय पुरस्कार १५,००० रुपये, तृतीय पुरस्कार ११,००० रुपये आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://tinyurl.com/5a5fru2v लिंकवर जाऊन खालील माहिती भरावी. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.