धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्या

0
10

धान परिषदेत उमटली मागणी : सावली येथे पार पडली पहिली परिषद

चंद्रपूर दि. २७ : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. शासन त्यांना कोणतीही मदत करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धानाला प्रति क्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव द्यावे, अशी मागणी शेतकरी परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिली सर्वपक्षीय धान परिषद सावली येथे गुरूवारी पार पडली. सदर धान परिषदेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धान परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या उपस्थित शेतकऱ्यांसमोर कोणताही आगत-स्वागताचा, हारतुऱ्याचा बडेजावपणा न करता साध्यापद्धतीने ज्येष्ठ शेतकरी सुकरुन पाटील आभारे व तिमाजी गेडाम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संविधान दिनाचे औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, उदय बोरेवार, मूल पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार, सावली पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा आखाडे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, एच.एम.टी. धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे, महाराष्ट्र भूषण प्रगतशिल शेतकरी शिवदास कोरे, ईश्वर कामडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव मोहुर्ले यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी २१ डिसेंबरपासून मूल येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी जोपर्यंत ठिय्या आंदोलनाला भेट देणार नाही, तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहील व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असा ठरावही यावेळी मांडण्यात आला. तसेच अनेक ठराव पारीत करण्यात आले. या धान परिषनेचे प्रास्ताविक राजाबाळ पाटील संगीडवार यांनी केले. संचालन मोतीलाल दुधे तर आभार राजू व्यास यांनी मानले. हजारांवर शेतकरी उपस्थित होते.