भविष्याचा ‘धोका’ ओळखा मोहिम;१२ ग्रामपंचायतींत राबविणार

0
6

सडक अर्जुनी : संभाव्य आजारांपासून गावकर्‍यांचा बचाव व्हावा, यासाठी गावातील प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्टिकरच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या घरी धोका असलेले लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येत असून हा भविष्यातील धोका ओळखून आता ‘लय भारी’ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे यांनी केले.
तालुक्यातील आमदार आदर्श ग्राम कनेरी/राम येथे समुदाय स्वच्छता कार्ड लावण्याच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. खंडविकास अधिकारी झेड.डी.टेंभरे यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कनेरीच्या सरपंच इंदु मेंढे, उपसरपंच प्रमराज मेंढे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन भेंडारकर, सरीता किशोर वैद्य, चंद्रकुमार सखाराम खोटेले, शिशु तावाडे, भागचंद रहांगडाले, विस्तार अधिकारी धोंगडे, गटसमन्वयक राधेशाम राऊत, ग्रामसेविका बागडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले यांनी स्टिकर्स तसेच शौचालय बांधकामाविषयी सविस्तर माहिती दिली.
हा उपक्रम गावकर्‍यांच्या हिताचाच आहे. शिवाय या उपक्रमासह गावात स्वच्छता जागरण मंचाची सुद्धा स्थापना करावयाची आहे. २0 कुटुंबांमागे एक सक्रिय सदस्य नेमून गावात वैयक्तिक शौचालय बांधकामाला गती आणावयाची आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी केले. 
गावाला हागणदारीमुक्त करण्यासह आपले गाव आदर्श करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्यकरण्याची ग्वाही याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकर्‍यांनी दिली.