लवकरच मी राज्य मंत्रिमंडळात- नाना पटोले

0
15

अर्जुनी मोरगाव दि.२: गेल्या २५ वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. मी लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतणार आहे. तेव्हा ही समस्या सोडवेन, असे वक्तव्य खासदार नाना पटोले यांनी करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.

येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी. हायस्कुल व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित वार्षिकोत्सव कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा तर प्रमुख पाहुणे म्हणून साकोलीचे आ.बाळा काशीवार, नागपूरच्या लेखिका शुभांगी भडभडे, साहित्यिक व लेखिका ज्योती पुजारी, प्रमोद लांजेवार, सुरेश भय्या, हरिदास गहाणे, पर्यवेक्षिका विणा नानोटी, लिना मिसार व सरिता शुक्ला आदी मंचावर उपस्थित होते.यावेळी अतिथींच्या हस्ते फ्रॅगरन्स, नवप्रभा व स्पेक्ट्रम या शालेय हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन छाया घाटे व शशीकांत लोणारे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी, शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षीका वीणा नानोटी यांनी केले. छाया घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अतिथींचा परिचय इंद्रनिल काशीवार यांनी करुन दिला.