स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा मंगळवारला

0
14

गोंदिया दि. ४: जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा दि.५जानेवारी २0१६ रोजी सकाळी ९.३0वाजता स्व.वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या प्रश्नावर युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी दरवर्षी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेतली जाते.
स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय या दोन गटात होणार आहे. स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थी सहभागी होतील.जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय गटासाठी स्वच्छ निर्मल शाळा, बालकास लावी लळा, शुध्द थेंब पाण्याचा लाभ आरोग्यदायी जीवनाचा, कचरा नव्हे कांचन-घनकचर्‍याचे व्यवस्थापन, मिळून सार्‍या जणी मिळवू स्वच्छ व शुध्द पाणी, साठवू थेंब थेंब पाण्याचा-विचार रुजवू पाऊस संकलनाचा, तर जिल्हास्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी तरूणाईचे नवे धडे-स्वच्छतेतून समृध्दीकडे, ‘करू सांडपाण्याचे व्यवस्थापन, धरतीचे होईल नंदनवन, करू तपासणी पाण्याची हमी आरोग्यदायी जीवनाची, माझ्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर, निर्मल व समृध्द महाराष्ट्र, बहू असोत सुंदर, स्वच्छ महादेश हे विषय आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकांची राज्यस्तरासाठी निवड होईल.
जिल्हास्तरावरील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस ११हजार, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांस सात हजार तर तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर राज्यस्तरावरील प्रथम विजेत्यास ५१हजार रुपये, द्वितीय ३१हजार आणि तृतीय २१हजार रुपयांचे पारितोषिक, करंडक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख यांनी दिली आहे.