गोसेखुर्द पुनर्वसन व भूमिअधिग्रहणाला प्राधान्य-मुख्यमंत्री 

0
14
240 कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येईल
नागपूर जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न
नागपूर दि. 4 : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहण व पुनर्वसन कामासाठी 240 कोटी रुपयाच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येईल. येत्या तीन वर्षात ही कामे पूर्ण करावी तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामास वेग द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी येथे अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री डॉ.मिलींद माने, प्रकाश गजभिये, आशिष देशमुख, सुधीर पारवे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, मलिक्कार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, पालकसचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त एस. पी. यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंग तसेच कृषी, सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील पुनर्वसन किती करायचे व किती शिल्लक आहे हे पाहून मिशन मोडवर काम करावे अशा सूचना देवून ते पूढे म्हणाले की, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण करावेत. मुखाबर्डी प्रकल्प डिसेंबर अखेर पूर्ण होईल. त्याचबरोबर अन्य प्रकल्पही मार्गी लावावे. सिंचनासाठी पाणी काटकसरीने वापरावे त्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
नागपूर जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व रिक्त पदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येतील. तसेच माजी मालगुजारी तलावांचा प्रश्नही सोडविण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी बैठकीत दिली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यअधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, कृषी सहसंचालक डॉ.विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू, सहकार उपनिबंधक भोसले, अग्रणी बँकेचे मशानकर व इतर संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Dgipr Nagpur's photo.