महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे – कशिश जायसवाल

0
8

गोंदिया,दि.४ : शहरी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून संघटन शक्ती दाखवावी. कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यासाठी बचतगटाच्या उद्योग, व्यवसायाला सुरुवात करुन स्वावलंबी व्हावे. असे मत गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८५ व्या जयंतीनिमीत्त राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने ३ जानेवारी रोजी अग्रसेन भवन गोंदिया येथे महिला परिषदेचे आयोजन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
श्री.जायसवाल म्हणाले, महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन एकीने आपले कार्य पुढे न्यावे. बचतगटाची निर्मीती करुन महिलांनी स्वयंरोजगार वाढवावा. यासाठी नगर परिषदेच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचा उद्देश, बचतगटांची बांधणी, स्वयंसहाय्य बचतगटाच्या माध्यमातून महिला हया सक्षमीकरणाच्या दिशेने कशा जाऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. गोंदिया नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ३० वार्डात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत गरीब, गरजू व अल्पसंख्याक महिलांचे २५० बचतगटांची निर्मीती करुन त्यांची गुणवत्ता टिकवून विकास कार्यावर भर देण्यात येत आहे असेही श्री.सोसे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाच्या स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक श्री.वासनिक, सामाजिक विकास आणि पायाभूत सुविधा न.प.चे धनराज बनकर, यशस्वी उद्योजिका शेवंताबाई रामटेके, श्हनाज शेख, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष अल्काताई रंगारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत स्थापित ३० स्वयंसहाय्य बचतगटांना लेखासंचाचे वाटप करण्यात आले. ‘विविधतेतून एकताङ्क हे पथनाट्य सहयोगिनीनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन माविमचे सहायक नियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर यांनी केले तर उपस्थिताचे आभार मोनिका चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, योगेश वैरागडे, पुनम साखरे, कुंजलता भुरकूटे, रोहिणी साखरे, तेजस्वरी येरपुडे, शालू मेश्राम आशिष बारापात्रे यांनी परिश्रम घेतले.