डॉ. निसवाडे बदलीप्रकरणी शासनाची माघार

0
7
नागपूर – डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि डॉ. समीर गोलावार यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी (ता. ७) मागे घेतले. यामुळे मेडिकलमधील वादग्रस्त ठरलेल्या  बदलीप्रकरणावर पडदा पडला. या वेळी उच्च न्यायालयाने बदली प्रकरणाची मूळ फाईल आणि चौकशी समितीच्या अहवालाची सत्यप्रत जमा करण्याचे निर्देश दिले.
डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकलच्या निवासी डॉक्‍टर आत्महत्येच्या प्रयत्न प्रकरणी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांची उपअधिष्ठाता पदापाठोपाठ विभागप्रमुख पदावरून हकालपट्टीचे आदेश दिले होते. मात्र, डॉ. व्यवहारेंची बदली करा, ही विद्यार्थ्यांची सामूहिक मागणी लक्षात घेत निसवाडे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, वैद्यकीय सहसंचालक यांच्याकडे प्रकरण हस्तांतरित केले. आत्महत्येचे प्रकरण संपत नाही तोच एका विद्यार्थिनीने डॉ. व्यवहारेंकडून होत असलेल्या छळाची तक्रार अधिष्ठात्यांकडे सादर केली. त्यानुसार अधिष्ठात्यांनी तक्रार महिला लैंगिक अत्याचारविरोधी समितीकडे वळती केली आणि अतिरिक्त अध्यक्ष डॉ. सोनुने यांना नेमून चौकशी सुरू केली. मात्र, दरम्यान अचानक शासनाने डॉ. व्यवहारे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. निसवाडे आणि डॉ. समीर गोलावार यांच्याही बदलीचे आदेश दिले. यामुळे संपूर्ण प्रकरण वादग्रस्त ठरले.