पांगोली नदी परिसरात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या

0
28

जनशक्ती संघटनेचे एसडीओ व तहसीलदारांना निवेदन

गोंदिया-भारतीय संस्कृतीत मानवी पार्थिवावर स्मशानभूमित अग्निसंस्कार करण्याची परंपरा आहे. मात्र, शहरातील छोटा गोंदिया, गोविंदपुर, संजयनगर, मामा चौक विशेषत: छोटा गोंदिया परिसरात महानुभाव पंथीय समाज, आदिवासी समाज, घारपगारी समाज वास्तव्यात आहेत, असे ही समाज आहेत की जे स्मशानभूमित अग्निसंस्कार करीत नसून ते पार्थिवाला जमिनीत पुरतात. परंतु, दफनभूमी नसल्याने अनेक समस्येला समोर जावे लागत आहे. करीत शासनाने दफन भूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जनशक्ती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
मृत्यूनंतर मानवी शरीरावर अंत्य संस्कार करण्याची प्रथा आहे. परंतु, विविध धर्मात वेगवेगळ्या पध्दतीने अंत्य संस्कार करण्यात येते. शिवाय काही नागरिकांच्या अंतीम ईच्छेनुसारही निधनानंतर अग्नी न देता माती देत असतात. परिसरातील पांगोली नदीच्या पात्रात उपलब्ध जागेत मानवी मृत शरीर दफन करण्यात येत होते. मात्र आता छोटा गोंदिया परिसरातील शेतकर्‍यांच्या शेती विकासासाठी व परिसरातील भुजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पांगोली नदी पात्रात शासनाकडून बंधारा बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे, परिसरात मृत शरीर जमिनीत पुरण्यासाठी, दफन करण्यासाठी आता जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचण निर्माण झालेली आहे.
यासंदर्भात जनशक्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले. शिष्टमंडळात जनशक्ती बहु. सामाजिक संगठनेचे संयोजक तिर्थराज ते. उके, मार्गदर्शक संगठक इंजि. मयूर मेर्शाम, अध्यक्ष अनिल शरणागत, प्रसिद्धी प्रमुख आशिष उईके, कोषाध्यक्ष देवेंद्र शेंडे, सचिव रोशन पाचे, सदस्य अनिल ढोमने आदी संगठनेचे पदाधिकारी, सदस्यगण यांचा समावेश होता.