रेती तस्करांविरूध्द गावकर्‍यांचा एल्गार

0
13

सडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वात जास्त रेतीघाट सडक-अर्जुनी तालुक्यात असून येथील रेती गोंदिया, गोरेगाव व देवरी तालुक्यात नेली जाते. रात्रीला सतत रेती चोरून नेणार्‍या ट्रॅक्टरांच्या आवाजाला कंटाळून बोथली गावाच्या गावकर्‍यांनी रेती तस्करांविरूध्द एल्गार पुकारला असून त्यांच्याविरूध्द एक ठरावच घेतला आहे.त्यामुळे तात्पुरती का होईना अवैध रेती चोरी थांबली आहे.
बोथली हे गाव सडक-अर्जुनीवरून ८ किमी अंतरावरचे असून बोथली व म्हसवाणी गावाच्यामध्ये असलेल्या मोठय़ा नाल्याची चांगली रेती असून चोरी करायला योग्य असे रस्ते असल्यामुळे रेती चोरी करणारे रेती तस्कर तर काही दिवसाच गौण खनिज व रेतीची चोरी करीत असत. परंतु रात्रीला तर जणु काही रेती चोरट्यांची स्पर्धा लागली असे वातावरण तयार होऊन रेतीची चोरी खुले आम करीत असत परंतु या टॅक्टरच्या आवाजांनी रात्रीला लोकांची झोपमोड होऊ लागली. तसेच जड वाहनांनी रस्त्यात खड्डेच खड्डे पडले.त्यामुळे गावकर्‍यांच्या लक्षात आले की, सरकारी अधिकार्‍यांशी मिळून असणारे रेती तस्कर गावकरीच बंद करू शकते. म्हणून गावकर्‍यांनी एकत्र येऊन सर्वानुमते ठराव मंजूर केला. अवैध रेती चोरीचा ट्रॅक्टर आला की त्याला ५हजार रुपये दंड ठोकायचा, अन्यथा त्याला गावाबाहेर जावू द्यायचे नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. महसूल विभाग रेती तस्करांच्या बाजूने असतानाही बोथली गावकर्‍यांनी हा धाडसी निर्णय घेतला.या ठरावावर सही करणार्‍यांमध्ये गावच्या सरपंच गीता चव्हाण, उपसरपंच दिनेश पारधी, माजी सरपंच कृष्णा भोयर, तंटामुक्त अध्यक्ष घनशाम चव्हाण, पोलीस पाटील मंदा लसवंते, ग्रा.पं.सदस्य नरेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य राधा मांदाळे, लिला भोयर, स्नेहल सातभावे, दिगांबर चव्हाण, विरेंद्र गजभिये, झमेंद्र चव्हाण आणि गावकर्‍यांचा समावेश आहे.