शाश्वत विकासाकरीता योजनांचा कृतीसंगम आवश्यक- दिलीप गावडे

0
12

उमेद अभियानाचा उपक्रम
गोंदिया, १९ : शासनाच्या विविध विभागामार्फत योजना राबविण्यात येतात. परंतू शाश्वत विकासाकरीता योजनांचा कृतीसंगम करुन प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याकरीता उमेद अभियानाच्या कार्यशाळेतून अधिक परिणामकारक विकास साधता येऊ शकतो. असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी व्यक्त केला.
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने (दि. १६) जि.प.चे स्वर्गीय वसंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कृतीसंगम कार्यशाळेत अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त के.पी.पटले, आत्माचे अतिरीक्त प्रकल्प अधिकारी के.आर.सराफ, कृषी अधिकारी कार्यालयाच्या उपसंचालक अश्विनी भोपळे, जि.प.च्या कृषि अधिकारी वंदना शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी जयवंत पाडवी यांनी कृतीसंगम योजनेद्वारे उमेद अभियानाच्या माध्यमातून गरीब व वंचितांचा विकास होत असल्याचे सांगितले. उमेद अभियानामुळे महिला जागृत होत असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी केले. प्रत्येक गावात राबविण्यात येणाऱ्या योजनांची कृतीसंगमद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार असून अजुनी/मोरगाव तालुक्यात ११५ गावांमध्ये अभियानाचे प्रत्यक्ष काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गडचिरोली येथील जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी अभियानाची व्याप्ती व कार्य विशद केले. कार्यशाळेमध्ये अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कृषि विभाग व पशूसंवर्धन विभागाच्या वतीने योजनांविषयक कृतीसंगम आराखडा तयार करण्यात आला. कार्यशाळेला भंडारा कृषि विभागाचे अधिकारी, कृषि व पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी, माविम व उमेद अभियानाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जि.प.च्या विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. उपस्थिताचे आभार कृतीसंगमचे गटसमन्वयक विजय भूरे यांनी केले.