सामाजिक न्याय विभाग स्थापना दिवस उत्साहात साजरा

0
13
वाशिम दि.15– सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाली.त्या निमित्ताने आज 15 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयात स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
       यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.विजयकुमार टेकवाणी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात पडताळणी समितीचे पोलिस उपअधिक्षक सुहास सातार्डेकर, पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील देवपुजारी,समाज भुषण पुरस्कार प्राप्त सु.ना.खंदारे,दिपक ढोले,शिवमंगल राऊत,प्रकाश गवळीकर,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपाळराव आटोटे गुरूजी, शाहिर संतोष खडसे,अविनाश कांबळे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एनडीएमजेचे राज्य सहसचिव तथा जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिमचे पी. एस. खंदारे हे होते.
              आपल्या मार्गदर्शनातून श्री.खंदारे यांनी सामाजिक न्यायाची भुमिका मांडताना सामाजिक न्यायाचे उदगाते फुले,शाहू,आंबेडकर यांना जी समाज रचना अपेक्षित होती ती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षातही पुर्ण झाली नाही.भारतीय राज्य घटनेच्या ऊद्देशिकेत नमुद केल्याप्रमाणे सामाजिक समता व दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांची विस्तृत मांडणी त्यांनी केली.एकीकडे सरकार विविध प्रकारच्या घोषणा व कल्याणकारी योजना तयार करते,तर दुसरीकडे बजेट इतरत्र वळवते.म्हणून बजेटचा कायदा झाला पाहिजे. आकस्मिकता योजना मंजुरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांनी भुमिका घ्यावी, उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करावी,यासह एनडीएमजेचे राज्य महासचिव एड डाॅ केवल ऊके यांनी जो मसुदा तयार करून शासनाला सादर केला आहे त्यांची अमलबजावणी कर्नाटक, केरळ,आंध्रप्रदेश,राजस्थान सरकार करते परंतु पुरोगामी महाराष्ट्राचा व फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होत नाही.आई व दाईमध्ये खुप फरक आहे.काही अधिकारी प्रामाणिकपणे योजना राबविण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात तरी अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने प्रयत्न करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त श्री.वाठ यांनी केले. संचालन प्रा. हिवसे यांनी तर आभार संगीता राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाशिम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.