पोलीस टेक एक्स्पोला नागरिकांचा प्रतिसाद

0
15

गोंदिया दि.२८: नवीन तंत्रज्ञानाबरोबर सामान्य नागरिकांनीही हायटेक व्हावे, बदलत्या नवनवीन तंत्रज्ञातून त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस टेक एक्सपो कार्यक्रमाचे आयोजन कारंजा पोलीस मुख्यालयात केले आहे. शनिवारी या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन  पोलीस अधिक्षक शशीकुमार मीणा यांच्या हस्ते करण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराज रणनवरे, रामनगरचे ठाणेदार बाळासाहेब पवार, शहरचे ठाणेदार दिनेश शुक्ला, गोरेगावचे ठाणेदार रविंद्र शिंदे, डुग्गीपारचे राजकुमार केंद्रे, रावणवाडीचे सुरेश निंबाळकर, गंगाझरीचे सुरेश कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्‍वर वर्गे, प्रकाश पाटील, दीक्षित दमाहे, अभिजीत अभंग उपस्थित होते.

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अँड्राईड अँप’ तयार करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.असुरक्षित असलेल्या महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी गोंदिया पोलीस आता हायटेक होत असून एका क्लिकवर ती महिला पोलिसांशी संपर्क साधू शकते. आपले नाव त्या महिलेने किंवा तरूणीने ‘अँड्राईड अँप’वर पाठविले तर लगेच तिचे ‘लोकेशन’ पोलिसांना कळेल. परिणामी तिला मदत देण्यासाठी पोलीस धावतील. 
आज २८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी भेट दिल्यास त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे. 
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांकडे कोणती अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत याचीही माहिती या कार्यशाळेच्या निमित्ताने जनतेला दिली जात आहे. एके-४७, एसएलआर, इन्सॉस व इतर हत्यारांची माहिती देण्यात आली. बुलेटप्रूफ वाहन, तसेच दहशतवादी कारवाया थांबविण्यासाठी बॉम्बशोध नाशक पथकाची माहिती, त्यात वापरण्यात येणारे साहित्य दाखविण्यात आले. बँकेच्या सुरक्षित व्यवहारासाठी तज्ज्ञांकडून माहिती दिली जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येत आहे.