ओबीसी लाभार्थ्यांना घरकूल द्या-विलास चव्हाण

0
21

सडक अर्जुनी दि.28 : शासनाने राज्यातील गोरगरीब बीपीएल लाभाथ्यार्ंकरिता इंदिरा आवास योजनेमधून घरकूल उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ओबीसी प्रवर्गातील एकही लाभार्थ्याला या योजनेचा लाभ उपलब्ध झाला नसून ती पूर्ण घोषणा पोकळच निघाली आहे. परिणामी बीपीएल धारकामध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण असून घरकूल उपलब्ध करवून  द्यावी अशी मागणी  सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे सदस्य विलास चव्हाण यांनी केली आहे.
काही वर्षापूर्वी बीपीएल प्रवर्गातील पात्र-अपात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित पंचायत समिती जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती. त्या प्रतिक्षा यादीत अनेक अपात्र व्यक्तींना पात्र आणि पात्र व्यक्तींना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे या प्रतीक्षा यादीत अनेक त्रुट्या असून नागरिकांनी आक्षेप घेतला होता. मात्र या यादीतील ओबीसी वगळता सर्वच लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. घरकुल अभावी गोरगरीबांना मोडकळीस आलेल्या झोपडीमधेच जीवन जगावे लागत आहे.
अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाच्या प्रतिक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट असल्याने आज नाही तर उद्या घरकूल उपलब्ध होईल या आशेने नवीन घर बांधणी केली नाही. आपल्याला घरकूल कधी उपलब्ध होईल याची माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत.
मात्र ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे कारण समोर करण्यात येत आहे. तत्कालीन सरकारने ओबीसी लाभार्थ्यांकरिता निधी उपलब्ध करुन दिला नाही. मात्र राज्यातील नवनिर्मित सरकारने याकडे विशेष लक्ष घालावे अशी मागणी ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे,संघटना सुध्दा प्रयत्नरत अाहे पण सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप  होत आहे.