माध्यमांनी संविधानावर आधारित लिखाणाला प्राधान्य द्यावे- रुपेशकुमार राऊत

0
21

माध्यम कार्यशाळा

  गोंदिया दि. 30: भारत देश हा जगातील सर्वात सशक्त लोकशाही असलेला देश असून आपली प्रत्येक कृती ही संविधानावर आधारित आहे. खऱ्या अर्थाने संविधानच आपले मार्गदर्शक आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत संविधानावर आधारित प्रश्न असतातच त्यामुळे माध्यमांनी संविधानावर आधारित वृत्त तसेच लेखमाला लिहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूण तरुणींना मार्गदर्शन करावे असे आवाहन रुपेशकुमार राऊत यांनी केले.

सामाजिक न्याय विभागामार्फत 26 नोव्हेंबर 2022, संविधान दिन ते 6 डिसेंबर 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन समता पर्व आयोजित करण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज 30 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे माध्यम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी प्रमुख वक्ते ते बोलत होते. उपयुक्त राजेश पांडे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. सहायक आयुक्त विनोद मोहतुरे व जिल्हा माहिती अधिकारी  रवी  गिते  प्रमुख  पाहुणे  म्हणून उपस्थित होते.

          संविधान व माध्यम यावर बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात व देशात घडणाऱ्या घडामोडींचा लेखाजोखा माध्यमात प्रसिद्ध होत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी वृत्तपत्र वाचून तयारी करत असतात. अशावेळी त्या घडामोडींची संविधानाच्या दृष्टिकोनातून कारणमीमांसा करणारे वृत्त व लेख प्रकाशित केल्यास विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरू शकतात. अधिकारी झालेल्या अनेकांच्या यशकथा त्यांनी यावेळी सांगितल्या.

 समता पर्वच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. समाज कल्याण विभागाने वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा विनोद मोहतुरे यांनी सादर केला.  महा आवास अभियान 2020-21 राज्यस्तरीय विशेष पुरस्कार रमाई आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा द्वितीय क्रमांक पुरस्कार गोंदिया जिल्ह्यास प्राप्त झाला. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मौजा अदासी ता. जि. गोंदिया येथे मंजूर व बांधकाम पूर्ण झालेल्या नाथजोगी  समाजाच्या वसाहतीकरीता अदासी ग्राम पंचायतीस महा आवास अभियान 2020-21 राज्यस्तरीय पुरस्कार राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट  जिल्हा द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विभागाच्या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

 एकाच पर्यटकाला एका भेटीत अनेक पर्यटन स्थळांना भेटी देत याव्यात म्हणून टुरिझम क्लस्टर तयार करण्यात येते त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांचे गाव ज्या ठिकाणी आहेत त्या गावांना विद्यार्थ्यांना भेट देऊन प्रेरणा मिळाली यासाठी एखादे क्लस्टर शासनाने तयार करावे व यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा अशी सूचना माध्यम प्रतिनिधींनी कार्यशाळेत केली.

          कार्यक्रमाचे संचालन आशिष जांभुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाज कल्याण निरीक्षक श्रीमती स्वाती कापसे, यांनी मानले. सदर कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.