सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा यावर कार्यशाळा संपन्न

0
6

वाशिम, दि. 30  : 6 डिसेंबरपर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज 30 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्तवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर अनुसूचित जातीच्या घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा संपन्न झाली.

         प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.

         अनुदानित वसतीगृह व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व वसतीगृहामुळे विद्यार्थी शिक्षणामध्ये प्रगती करीत असल्याची माहिती दिली.

       अधीक्षक कल्पना ईश्वरकर यांनी सामाजिक न्याय विभाग यांच्या संकल्पनेतून संविधान दिनानिमीत्त सामाजिक न्याय पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांची रुपरेषा मांडली.

         प्रमुख पाहुणे सहाय्यक शिक्षक दिगंबर डोंगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून समाज कल्याण योजनांची पायाभरणी झाली व अनुसूचित जातींचे उत्थान करण्यासाठी राज्य सरकारने त्यासाठी योजना अंमलात आणल्या. समाज कल्याण विभागाअंतर्गत चालणाऱ्या विविध संस्था व योजनांद्वारे अनुसूचित जातींचा कशा पद्धतीने विकास होत आहे याबाबतची माहिती दिली.

         जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल. बी. राऊत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, समाज कल्याण निरीक्षक देवानंद लकडे, एस.एम. निमन, आर. टी. चव्हाण, पी. ए. गवळी व गोपाल करंगे व तालुका समन्वयक उपस्थित होते.

          कार्यक्रमाकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, अनिल गायकवाड, सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन हिवसे यांनी केले. आभार प्रदिप जाधव यांनी मानले.