ग्राहकांनी आपले अधिकार व हक्काबाबत नेहमी जागरुक राहावे – भास्कर योगी

0
9

गोंदिया दि.29 : बाजारातून कोणतीही वस्तु खरेदी करतांना आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी आपले अधिकार व हक्काबाबत नेहमी जागरुक राहावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच चे अध्यक्ष भास्कर योगी यांनी केले.

          अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी लिना फलके, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.वाय.देशमुख, अन्न निरीक्षक अधिकारी एस.एस.देशपांडे, वैद्यमापनशात्र निरीक्षक एस.एम.सराफ, ग्राहक संरक्षण संघटक शारदा सोनकनवरे, सुशील मानकर व बाबुराव डोमाळे उपस्थित होते.

           श्री. योगी पुढे म्हणाले, ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांच्या हिताकरीता ग्राहक संरक्षण कायदा 2019 तयार करण्यात आलेला आहे, त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. नागरिकांनी कोणताही व्यवहार करतांना किंवा सेवा घेतांना बिले, विमा पॉलीसी संबंधी असल्यास मुळ पॉलीसी घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपली फसवणूक झाल्यास संबंधीत प्राधिकरणाविरुध्द तक्रार दाखल करणे नागरिकांना सोईचे होईल. जिल्हा ग्राहक आयोगामध्ये ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा अतिशय जलद गतीने केला जातो. 2019 च्या नवीन सुधारीत कायदयाच्या तरतुदीत भर पडल्यामुळे आता प्रकरण मधील वादाचा निपटारा जलद गतीने मध्यस्थी कक्षाचे मार्गाने करण्याचे प्रावधान आहे. बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करतांना ग्राहकांनी दुकानदाराला बील मागणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.

         श्रीमती देशपांडे म्हणाल्या, ग्राहकांची फसवणूक होणार नाही यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरुक राहावे. भेसळ अन्न विक्री करणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाते. यासाठी टोल फ्री क्रमांक 18884636332 यावर तक्रार नोंदवू शकतात.

          ग्राहक जागरुक झाला तर ग्राहकांची फसवणूक होणार नाही. 31 रेशन दुकानदारांना ISO करण्याचा पुरवठा विभागाचा मानस सुरु आहे असे श्री. देशमुख म्हणाले.

          यावेळी सांस्कृतिक कलापथक मंडळ गणखैरा यांनी जागो ग्राहक जोगो यावर आधारीत पथनाट्य सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

         प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी लिना फलके यांनी केले. संचालन पुरवठा निरीक्षक स्मिता आगासे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कमलेश मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमास रेशन दुकानदार व रेशनधारक बहुसंख्येने उपस्थित होते.