ग्रंथामुळे जीवन समृध्द होण्यास मदत-पदमश्री नामदेव कांबळे

0
13
????????????????????????????????????

वत्सगुल्म ग्रंथोत्सवाचे उदघाटन

· ग्रंथ दिंडीतून वाचन संस्कृतीचा जागर

·ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन

       वाशिम, दि. 06  : जीवन जगतांना श्रध्दा असणे आवश्यक असते. श्रध्देने माणसाचे आयुष्य उन्नत होते. जीवन उन्नत आणि समृध्द करणारी दुसरी बाब म्हणजे आपली संस्‍कृती आहे. भारतीय कुटूंब व्यवस्था ही दिर्घकाळ टिकणारी असल्यामुळे या व्यवस्थेतून भारतीयांना आनंद व समाधान मिळत असते. माणूस घडविण्यात ग्रंथांची भूमिका महत्वाची असून ग्रंथांमुळे माणसांचे जीवन समृध्द होण्यास मदत होते. असे प्रतिपादन पदमश्री नामदेव कांबळे यांनी केले.

आज 6 जानेवारी रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित वत्सगुल्म ग्रंथोत्सव – 2022 च्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. कांबळे बोलत होते. ग्रंथोत्सवाचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक प्रा. धोंडूजा इंगोले, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे, काव्याग्रह प्रकाशन वाशिमचे व्यवस्थापकीय संपादक विठ्ठल जोशी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोलते यांची उपस्थिती होती.

श्री. कांबळे म्हणाले, जसजसे वय वाढत जाते तसतशी आपली आकलन क्षमता देखील वाढत जाते. मनाच्या कक्षा देखील विस्तारत जातात. या कक्षाच्या विस्तारामुळे ग्रंथांचे नवनवीन अर्थ कळतात. आपल्या बुध्दीचा अवाका वाढल्यावर साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. नवे अर्थ कळत असतात. हा ग्रंथोत्सव सांस्कृतीक धोरणानुसार होत आहे. हे धोरण सुधारीत आणि भक्कम करण्यासाठी जी समित आहे, त्या समितीचा सदस्य म्हणून चांगल्या सांस्कृतीक धोरणाच्यादृष्टीने काम करण्यात येईल. केवळ ग्रंथोत्सवातून ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री या पुरतेच हे प्रदर्शन मर्यादित न राहता प्रत्येक घरी पुस्तके असली पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी जर ललीत साहित्याची पुस्तके उपलब्ध झाली तर घरातील लहान मुलांना देखील वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

अलीकडेच अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून डिजीटल पुस्तके उपलब्ध होऊ लागली असल्याचे सांगून श्री. कांबळे म्हणाले, त्यामधून सुध्दा मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. जिल्हा ग्रंथोत्सवात जिल्हयातील साहित्यीकांचा सहभाग असला पाहिजे. त्यांची पुस्तके देखील या ग्रंथोत्सवात उपलब्ध झाली पाहिजे. जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयातून सामुहिक पुस्तके वाचनाची चळवळ निर्माण झाली पाहिजे. वाचनामुळे माणसाच्या क्षमता विकसीत होतात. वाचन समृध्द समाज निर्माण झाला तर नैतिक समाज निर्माण होण्यास मदत होईल. माणसाला तारुण नेण्याची क्षमता ग्रंथात आहे. प्रमाणिकपणे वाचन केले तर आपल्या विकासाला चालना मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले. श्री. कांबळे यांनी यावेळी महाभारतावर आधारीत वि.स. खांडेकर यांची ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त ययाती कादंबरी व 1995 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राघववेड हया शाळकरी दलित मुलांवर आधारीत कादंबरीचे थोडक्यात विश्लेषण करुन सांगितले.

उदघाटक म्हणून बोलतांना श्रीमती आंबरे म्हणाल्या, वाचन केले तर आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात वाचनामुळेच तारुण नेता येईल. ज्याप्रमाणे आपला पहिला गुरु आई आहे. तर दुसरे गुरु हे ग्रंथ आहेत. वाचनाने माणूस समृध्द होतो. वाचनामुळेच माणूस हा माणसाशी माणसाप्रमाणे वागतो. माणूसकी आयुष्यात कधीही सोडू नये. सावित्रीबाई फुलेंनी आधी महिलांना शिक्षीत केले. त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय आहे. उपस्थित महिलांनी ग्रंथोत्सवात लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन पुस्तके बघितली पाहिजे. त्यातील काही पुस्तके खरीदी देखील केली पाहिजे. वाचन माणसाला कायम समृध्द बनवित असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. इंगोले म्हणाले, वाचन संस्कृती आणि श्रवण संस्कृती हया दोन संस्कृती अतिशय महत्वाच्या आहेत. हया दोन्ही संस्कृती प्राचिन आहे. जेव्हा लेखन संस्कृती नव्हती त्यावेळी श्रवण संस्कृती तिचे काम करीत होती. ग्रंथ हे आपल्यातील माणूसपण जिवंत ठेवण्याचे काम करते. ग्रंथाने माणसे घडतात. पण ते वाचन सम्यक आणि उचित असावे. ग्रंथालय संस्कृती महत्वाची आहे. मुलांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे. बृहद वाचन हे अतिशय महत्वाचे आहे. तेवढाच बृहद अभ्यास देखील महत्वाचा आहे. आपण ज्या ज्या धर्मावर सदसदविवेक बुध्दीने श्रध्दा ठेवतो ती श्रध्दास्थाने महत्वाची असतात. असे ते म्हणाले.

प्रा. काळे म्हणाले, वाचन संस्कृतीला उतरती कळा लागली आहे. वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे. वाचन संस्कृती ही टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे यासाठी ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षेसाठी असलेली पुस्तकेच न वाचता ललीत साहित्याची देखील पुस्तके वाचली पाहिजे. अभ्यासापुरते वाचन मर्यादित न ठेवता ज्या पुस्तकातून ज्ञानात भर पडते व माहिती मिळते अशी पुस्तके वाचली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती बजाज म्हणाल्या, पुस्तकातून बरेच ज्ञान व माहिती मिळत असते. आतापासूनच बालकांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. आज दोन वर्षाच्या बालकाला देखील घास भरवतांना मोबाईल किंवा टिव्ही सुरु ठेवावा लागतो. तेंव्हाच तो जेवन करतो. पुर्वी लहान मुलांना जेवतांना विविध प्रकारचे चित्र दाखवून घास भरविण्यात येत होता. पुढच्या पिढीला वाचवायचे असेल तर त्यांना वाचनाची गोडी लावणे महत्वाचे आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री. कोलते यांनी ग्रंथोत्सव आयोजनामागची भूमिका विषद केली. प्रारंभी मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनात लावलेल्या पुस्तक विक्री स्टॉलचे फित कापून उदघाटन केले. दीप प्रज्वलन करुन समाज सुधारकांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पुजन केले. लोककलावंत श्री. गायकवाड व श्री. इंगोले यांच्या संचाने स्वागत गीत सादर केले.

सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडीचा शुभारंभ राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून करण्यात आला. या ग्रंथ दिंडीमध्ये शहरातील बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे, श्रीमती सुशिलाबाई जाधव विद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होते. सहभागी विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीदरम्यान वाचन संस्कृतीच्या जागर करणाऱ्या घोषणा दिल्या. ही दिंडी शिवाजी चौक, पाटणी चौकातून शिवाजी विद्यालय येथे कार्यक्रमस्थळी पोहोचली. उदघाटन कार्यक्रमाला जिल्हयातील साहित्यीक, कवी, जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयाचे संचालक, जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, पत्रकार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संजय धांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे यांनी मानले.