मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात महिलांचे हाडे गोठवणाऱ्या थंडीत २१ दिवसांपासून उपोषण

0
13
चंद्रपूरः देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली. मात्र आपले प्रश्न सोडवण्यासाठी महिला प्रशासनाला हाक देत असतात. मात्र प्रशासनाचे महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. याचा प्रत्यय चंद्रपुरातील महिलांना येत आहे. बिअर बार ,बिअर शॉपी आणि दारू दुकानाच्या स्थलांतरासाठी २१ दिवसापासून हाडे गोठविणाऱ्या थंडीत महिलांचे उपोषण सुरू आहे. मात्र महिलांच्या या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाचे अद्याप लक्ष गेले नाही. या दुकानापासून बुद्ध विहार, मज्जिद आणि प्रसूती केंद्राचे अंतर शंभर मीटरच्या आत आहे. असे असताना या दुकानाला परवानगी मिळालीच कशी? असा प्रश्न महिला उपस्थित करीत आहेत.उपोषणकर्त्या बाबूपेठ वार्डातील महिला आहेत. दुकानासमोरच त्यांचे उपोषण सुरू आहे. विद्यार्थिनी, महिला ज्या मार्गाने ये-जा करतात त्याच मार्गावर ही दुकाने आहेत. दुकान परिसरात मद्यापींची मोठी गर्दी असते. भांडणे,शिव्याशाप देण्याचे प्रकार इथे घडत असतात. याचा त्रास महिलांना होतो आहे, असं गार्हाण त्यांनी मांडलं.महात्मा फुले चौकत असलेले देशी दारूचे दुकान यवतमाळ जिल्हातून चंद्रपूर येथे स्थलांतर केलेले आहे. विशेष म्हणजे हे दुकान वस्तीतील एका घरात भाड्याने आहे. या दुकानाला परवानगी देऊ नका अशी मागणी लावून धरली होती. मात्र महिलांच्या विरोधांना न जुमानता प्रशासनाने परवानगी दिली.दुकाने इतरत्र स्थलांतर करण्यात यावे ही मागणी घेऊन महिलांनी नागपुरात झालेलं हिवाळी अधिवेशन गाठलं. त्यावेळी त्यांना दुकाने स्थलांतरित केलं जाईल असं आश्वासन दिल गेले. मात्र लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन फोल ठरल्याने महिला आक्रमक झाल्या आहे. ही तिन्ही दुकाने बंद करण्याची मागणी आता महिलांनी लावून धरली आहे.